रत्नागिरी : येथील जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याने सध्या हे वाचनालय ओस पडले आहे. जिल्हा सेवायोजन कार्यालयाचे १९९७ पासून जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र असे नामकरण झाले आहे. त्यामुळे या केंद्रामार्फत आता रोजगारासाठी आॅनलाईन नोंदणीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बेरोजगारांना रोजगार संधीची माहिती देतानाच त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत सर्वकाही मार्गदर्शन करण्यात येते.स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक असणारी अशी महागडी पुस्तके या उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने २००४ सालापासून या कार्यालयातर्फे कार्यालयातील जागेत हे मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे.या ग्रंथालयसदृश अभ्यासिकेत कार्यालयीन वेळेत बैठक व्यवस्थेसह सुमारे ७०० इतकी पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके हजारो रूपये किमतीची आहेत. जिल्हा निवड समितीमार्फत ज्या परीक्षा होतात. त्या सर्व स्पर्धात्मक परीक्षा तसेच लोकसेवा आयोग, रेल्वे भरती, बँक, मिलीटरी भरती आदींच्या परीक्षांसाठी उपयुक्त असणारी अशी ही सर्व पुस्तके आहेत. मात्र, गेल्या १० वर्षात सुमारे ५० उमेदवारांनीच या वाचनालयाचा लाभ घेतला आहे.या परीक्षांसाठी बाजारात हजारो रूपये किमतीची पुस्तके खरेदी करणे सामान्यांना शक्य नसते, हे लक्षात घेऊन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्रातर्फे हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, उमेदवारच याकडे फिरत नसल्याने हे वाचनालय सध्या ओस पडलेले आहे. वापराविना ही सर्व पुस्तकेही धूळ खात पडून आहेत.या कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या वाचनालयाचा लाभ स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन या कार्यालयाचे सहायक संचालक शा. गि. पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)रोजगार-स्वयंरोजगार केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी मोफत वाचनालय.केंद्रातर्फे रोजगारासाठी आॅनलाईन नोंदणी.महागडी पुस्तके मोफत बनतात साथीदार.स्वयंरोजगार केंद्राच्या ग्रंथालयात सध्या ७०० पुस्तके उपलब्ध.
स्वयंरोजगार केंद्राचे वाचनालय ओस
By admin | Published: December 24, 2014 10:04 PM