राजापूर
: तालुक्यातील दळे लासेवाडी येथे सुमारे ६० फूट विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना बुधवारी घडली आहे. विहिरीत पडलेला बिबट्या ही सुमारे चार वर्षे वयाची मादी असून, भक्ष्याच्या शोधात असताना ती विहिरीत पडली असावी, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
दळे लासेवाडी येथील उदय वामन गिरकर यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. याबाबत गिरकर व ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी तत्काळ राजापूर वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. तत्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी व त्यांचे सहकारी तेथे गेले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला विहिरीबाहेर काढले. विभागीय वनअधिकारी दीपक खाडे, परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण, प्रमोद चव्हाण, अनिकेत मोरे आदींसह स्थानिक सरपंच महेश करंगुटकर, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीत पिंजरा सोडून बबिट्याला सुखरूप बाहेर काढले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.