असुर्डे : कळंबुशी - काेंडिवरे (ता. संगमेश्वर) मार्गावरील पुलावरून जाताना ७० वर्षांच्या राजाराम आत्माराम घाग यांचा पाय घसरला आणि ते थेट पाण्यात पडले. पाेहणारे असूनही ते पाण्यात हतबल झाले. वाहत जाताना त्यांनी माेठ्या झाडाचा आधार घेतला आणि ते थांबून राहिले. हा सारा प्रकार एका दुचाकीस्वाराने पाहिला आणि त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. ही माहिती मिळताच काही तरुण तेथे आले आणि त्यांनी पुराच्या पाण्यातून त्यांची सुटका केली. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचे प्राण वाचले.
गेले सहा दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कळंबुशी - काेंडिवरे या मार्गावरून शुक्रवारी, सकाळी ११ वाजता राजाराम आत्माराम घाग जात हाेते. काेंडिवरे येथील पुलावरून त्यांचा पाय घसरला व ते थेट पाण्यात पडले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की ते पोहणारे असूनही वाहू लागले. पाण्याची तीव्र गती असल्यामुळे ते हतबल झाले. शेवटी त्यांनी एका मोठ्या झाडाचा आधार घेतला. बराच वेळ ते झाडाला घट्ट पकडून धीराने राहिले. याच वेळी तिथून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना वाहत जाताना पाहिले. त्याने तत्काळ कळंबुशीतील देवेंद्र झगडे यांना फोन केला. देवेंद्र यांनी हातातील काम टाकून नदीकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत दर्शन झगडे, दत्ताराम झगडे, रवींद्र झगडे, गणपत चव्हाण, सचिन चव्हाण, हृतिक झगडे, रितेश घाग हे तेथे दाखल झाले.
पुराच्या पाण्याचा वेग प्रचंड असल्याने पाेहण्यात तरबेज असणाऱ्याची गरज हाेती. त्याचवेळी माखजन कुंभारवाडीतील अमित गोपाळ कुंभार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीपात्रात उडी घेतली. अमित कुंभार व देवेंद्र झगडे दोरी घेऊन राजा घाग यांच्यापर्यंत पोहोचले व त्यांच्या कंबरेला दोरी बांधून नदी किनारी आणले. यासाठी माखजन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिंदे यांचेही सहकार्य लाभले.
--------------------------
संगमेश्वर तालुक्यातील काेंडिवरे येथील पुलावरून वाहत जाणाऱ्या राजाराम घाग यांच्यासाेबत त्यांच्यासाठी देवदूत ठरलेले अमित कुंभार.