मंडणगड : मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड, माती व झाडी झुडपात लुप्त झालेला मुख्य प्रवेशद्वार प्रकाशात आणला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या अभ्यास मोहिमेदरम्यान हा दरवाजा समाेर आला.गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता. गडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली.हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून, या ठिकाणी राजमार्ग ही आहे. साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच हे प्रवेशद्वार असून, त्याचा घेरा /देवड्याचा परिसर २१ बाय २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढा आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून, त्यावर ढासळलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत.सध्या गडावर प्रवेश करतो तो डांबरी रस्ता गडाचा पूर्वीचा मुख्य मार्ग नसून त्याच्या खालच्या बाजूला मुख्य राजमार्ग आहे. या मार्गाने (प्रवेशद्वाराने) प्रवेश केल्यावर थेट गणेश मंदिराच्या दिशेला बाहेर पडतो. या अभ्यास मोहिमेत गडाचा पूर्ण परिसर अभ्यासून पुढील संवर्धन कार्याची दिशा ठरविण्यात आली. या मोहिमेत योगेश निवाते, ललितेश दवटे, अमित महाडिक, अमोल भुवड, अमित भुवड, सोमेश बुरुनकर, सुयोग मयेकर, सिद्धेश जाधव, सागर पाटील आणि गणेश रघुवीर हे उपस्थित होते.
संवर्धन कार्यसह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धन कार्य करत आहे. मंडणगड किल्ल्यावर असलेल्या तोफेला लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा बसविण्यात आला तसेच गडावरील धान्य कोठार आणि घरांच्या जोत्याचे अवशेष स्वच्छ करण्यात आली. त्याचबराेबर प्रतिष्ठानतर्फे गडावर सूचनाफलक दिशादर्शक लावण्यात आले.
गडावरील या मुख्यप्रवेशद्वार उजेडात आल्यामुळे आज गडाची आणखी एक महत्त्वाची दुर्गवास्तू शिवप्रेमींना पाहता येईल. या प्रवेशद्वार संवर्धनाची जबाबदारी सह्याद्रि प्रतिष्ठान मंडणगड विभाग घेत आहे. - राहुल खांबे, विभाग प्रमुख, मंडणगड.