पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण एकदम घटल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, नुकताच पार पडलेला गणेशोत्सव व येणारा भातकापणी हंगाम, त्यात पावसाळी वातावरणात होणारा बदल लक्षात घेता विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये पहिल्या लाटेत योग्य तऱ्हेने नियमांचे पालन केल्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे त्या कालखंडामध्ये एकूण १६० रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यात आठजणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक संसर्गाला सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेमध्ये नियमांचे योग्य तऱ्हेने पालन न केल्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पहिल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर योग्य तऱ्हेने नियमांचे पालन सुरू करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पोलीस यंत्रणेचा वचक असल्यामुळे कालांतराने रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात झाली.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये रुग्णसंख्या एकदमच कमी झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी रुग्णसंख्या चार होती. त्यामुळे या उत्सवादरम्यान प्रत्येक गावामध्ये वातावरण चांगले असल्यामुळे उत्सवही त्या प्रमाणात आनंदाने साजरा करण्यात आला. या चार रुग्णांनंतर नव्याने रुग्ण सापडला नव्हता. परंतु, दोन दिवसांपूर्वी एक आरोग्यसेविका कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. एप्रिल ते २० सप्टेंबर यादरम्यान १,२८४ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून त्यातील ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक रुग्ण रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे रुग्णसंख्येत घट होत असल्याचे चित्र सध्या एकंदरीत आकडेवारीच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे या परिसरात असलेले ५ ग्राम विलगीकरण कक्ष व एक कोविड सेंटर रुग्णांविना बंद आहेत.