चिपळूण : आपल्या सर्वांच्या आयुष्यात ताणतणावाला सामोरे जावे लागते. आयुष्यातील अनेक लहान मोठ्या घटना आयुष्यात तणाव निर्माण करु शकतात. नकारात्मक सामाजिक स्थिती जसे बेरोजगारी, निकृष्ट निवास, त्रासदायक शेजारी, नातेसंबंधातील बिघाड, कामातील अडचणी या सर्व आपल्या आयुष्यात तणाव आणू शकतात. परंतु, तणावाला एक सकारात्मक बाजू आहे. मर्यादित प्रमाणातला तणाव हा आवश्यक व अल्हाददायक ठरु शकतो, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी केले. चिपळूण पोलीस वसाहतीत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात गुरुवारी दुपारी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मधुमेह व मानसिक ताणतणाव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. कोतकुंडे यांनी मानसिक ताणतणावाबाबत मार्गदर्शन केले. प्रथम त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पोलीस बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील कोतकुंडे यांनी मधुमेह कसा होतो, त्याचे तत्व, उद्देश, उद्दिष्ट, आरोग्य उपक्रम आदी समाजावून सांगितले. मधुमेह झाल्यास कोणती काळजी घ्यायची, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी डॉक्टरांचे स्वागत केले व या व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, पोलीस उपनिरीक्षक दोंदे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मर्यादेत तणाव अल्हाददायक : कोतकुंडे
By admin | Published: November 21, 2014 10:02 PM