लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थींच्या यादीमध्ये प्रचंड अनियमितता आहे. या यादीत बंगाल, झारखंड येथील लाभार्थींचा समावेश आहे़ तालुक्यातील अडखळ, आंजर्ले, मुर्डी आदी गावांमध्ये या योजनेचे बोगस लाभार्थी असल्याचा संशय व्यक्त करून याची चौकशी करण्याची मागणी दापोली तालुक्यातील मुर्डी येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ डॉ. विनय जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.
त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या रत्नागिरीच्या दापोली तहसीलमधील आडे, आंजर्ले व अडखळ या गावांच्या यादीत बंगाल आणि झारखंड येथील नागरिकांची नावे आहेत़ नुकत्याच जाहीर झालेल्या यादीमध्ये गावातील लोकसंख्येपेक्षा लाभार्थींची नावे अधिक आढळली आहेत. राज्यातील महसूल विभाग या घोटाळ्यामध्ये सामील आहे की, इतर राज्यांची नावे चुकून येथे समाविष्ट केली गेली आहेत, हे पाहण्याची गरज आहे.
पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कृषी मंत्रालय यांनी या अनियमिततेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग किंवा महसूल विभाग जबाबदार आहे किंवा इतर कोणी जबाबदार आहे का? त्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमार्फत चौकशी व्हायला हवी आणि दोषींनी शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी या तक्रार अर्जात केली आहे. बंगाल व झारखंड येथील बोगस लाभार्थींची नावे दापोलीच्या यादीत येणे, हे अत्यंत गंभीर मानले जात आहे.