रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या २७ नोव्हेंबर २०१६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या १५ उमेदवारांची यादी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे पत्रकारपरिषदेत जाहीर केली. त्यामध्ये सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष संजय साळवी, माजी नगराध्यक्ष मधुकर घोसाळे व राजेश्वरी शेट्ये यांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरित १५ उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर होणार असल्याची माहितीही खासदार राऊत यांनी दिली. नगरसेवकपदासाठी सेनेतर्फे ज्या १५ जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये समाविष्ट उमेदवार, त्यांचे प्रभाग आणि आरक्षण याप्रमाणे : संजय प्रभाकर साळवी (प्रभाग १ ब, खुला प्रवर्ग), स्मितल सुरेश पावसकर (प्रभाग २ अ, महिला), राजेश्वरी राजन शेट्ये (३ अ, महिला), राजेश विनायक सावंत (३ ब, खुला प्रवर्ग), फौजिया तन्वीर मुजावर (४ अ, महिला), मौलवी कासिम नदाफ (४ ब, खुला प्रवर्ग), शिल्पा प्रशांत सुर्वे (५ अ, महिला), मधुकर कृष्णा घोसाळे (६ अ, ना. मा. प्र.) दीक्षा दत्रात्रय साळवी (७ ब, महिला), निशा मदन मांडवकर (९ अ, महिला), मीरा प्रसन्न पिलणकर (११ अ, ना. मा. प्र. महिला), राकेश चंद्रकांत नागवेकर (११ ब, खुला प्रवर्ग), रशिदा दिलावर गोदड (१३ अ, ना. मा. प्र. महिला), अस्मिता सुशील चवंडे (१४ ब, महिला) व हमीद मजीद फणसोपकर (१५ ब, खुला प्रवर्ग). रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक यावेळी सेना पूर्णत: स्वबळावर लढवत आहे. रत्नागिरीचा सर्वांगिण विकास हेच ध्येय समोर ठेवून शिवसेना ही निवडणूक लढवणार असल्याने सेनेला नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळेल, याची खात्री असल्याचेही खासदार राऊत म्हणाले. यावेळी संघटनात्मक दोन नेमणुकाही जाहीर करण्यात आल्या. सेनेच्या रत्नागिरी शहर महिला आघाडीप्रमुखपदी मनीषा हेमंत बामणे यांची नियुक्ती करण्यात आली, तर शहरप्रमुख प्रमोद शेरे यांच्या मदतीसाठी रत्नागिरी शहर संघटक म्हणून माजी नगरसेवक बिपीन बंदरकर यांची निवडही यावेळी जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या या दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवडणुकीत मतदारांसमोर कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार, असे विचारता ते म्हणाले, मिलिंद कीर यांनी २०१२मध्ये नगराध्यक्ष असताना केलेला शहर विकासाचा आराखडा मंजूर झाल्याने त्यातील ठरलेल्या विकासकामांना आता गती मिळाली आहे. पाणी पुरवठा, चांगले रस्ते, मोकाट जनावरांची समस्या सोडविणे, याचबरोबर शिवाजी स्टेडियममध्ये क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी ४ कोटींच्या निधीची तयारी ठेवण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत व राजन साळवी, नगराध्यक्ष उमेदवारीचे इच्छुक तथा तालुकाप्रमुख बंड्या साळवी व राहुल पंडित उपस्थित होते. विमानतळ धावपट्टीची डिसेंबरमध्ये चाचणी रत्नागिरी विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असून, येत्या डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्याचवेळी धावपट्टीवर १०० प्रवासी वाहून नेणाऱ्या विमानाची चाचणीही घेतली जाणार आहे. त्यानंतर सहा महिन्यात विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू केली जाणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. युती भाजपने तोडली रत्नागिरी नगरपरिषदेत युती तोडण्याचे काम भाजपने केले. त्यांना सेनेबरोबर युती नको होती. त्यामुळे युती सेनेने तोडलेली नाही, हे रत्नागिरीकरांना माहिती आहे. भाजपच्या जिल्हा नेतृत्वानेच युती तोडली. युती तुटल्यानंतरच्या काळात शहरात वन मॅन शो सुरू होता. रत्नागिरीकरांच्या मूलभूत समस्या सोडवण्याकडे भाजप नगराध्यक्षांचे दुर्लक्ष झाले, हे जनतेला माहिती आहे. युती नसल्याचा कोणताही फटका सेनेला बसणार नाही. जनमानसात चांगली प्रतिमा असलेले उमेदवार शिवसेनेतर्फे निवडणूक रिंगणात उतरवण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे ठरविणार नगराध्यक्ष उमेदवार नगराध्यक्ष उमेदवारीसाठी रत्नागिरीत तिघेजण इच्छुक आहेत. मात्र, त्याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला द्यावी, याचा निर्णय सेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेणार आहेत. त्यांच्या आदेशानंतरच हे नाव जाहीर होणार आहे, असे खासदार राऊत म्हणाले. विनायक राऊत म्हणाले... - कचरामुक्तीसाठी वेंगुर्ला पॅटर्ननुसार प्रकल्प रत्नागिरीतही राबविला जाणार. -रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत सेना प्रथम क्रमांकावर, राष्ट्रवादी दुसऱ्या, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहणार.
नगरपरिषदेसाठी सेनेची पहिल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर
By admin | Published: October 26, 2016 12:16 AM