रत्नागिरी : मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी आणि कोकणातून नवे साहित्यिक घडावे या उद्देशाने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे ‘साहित्यिक गुढी’ उभारण्यात येणार आहे. साहित्याची गुढी उभारून संगमेश्वरी बोलीभाषेतील गाऱ्हाणे घालण्यात येणार आहे. हा साेहळा २१ मार्च २०२३ राेजी सकाळी १० वाजता ग्रंथालयाच्या प्रांगणात साजरा हाेणार आहे.
कोकणच्या साहित्य निर्मितीला आलेली मरगळ दूर होऊन सकस साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी अर्थात वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी जनसेवा ग्रंथालयातर्फे ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दि. २१ मार्च २०२३ रोजी जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ‘साहित्य पताका’ लावण्यात येतील.
यावेळी पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येईल. त्यानंतर गुढीपूजा व ग्रंथपूजा हाेणार आहे. गुढीपूजा झाल्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणाऱ्या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे