चिपळूण : अपंगांसाठी आर्थिक हातभार लागावा, यासाठी नगर परिषदेतर्फे विविध रोजगार साहित्य उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. यासाठी नगर परिषदेकडून दरवर्षी आर्थिक तरतूदही केली जाते. यावर्षीही नगर परिषद हद्दीतील अपंग बांधवाना साहित्य वाटप केले जाणार आहे. अपंग व्यक्ती ही अन्य कुटुंबावर काही वेळा भार म्हणून जीवन जगत असते. या अपंगांना जीवनात स्वत: काही तरी करता यावे, या उद्देशाने शासकीय पातळीवर विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात. प्रत्यक्षात या योजनांचा लाभ अपंग व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. ग्रामीण भागातील अनेक अपंग बांधव आपल्याला सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन स्तरावर पत्र व्यवहार करीत असतात. मात्र, या अपंग बांधवांना कोणी वाली नसल्याने ते आजही हालाखीचे जीवन जगत आहेत. नगर परिषदअंतर्गत विविध विकासकामे केली जातात. अपंगांसाठी वर्षाकाठी काही ठराविक निधी खर्च केला जातो. त्या अनुषंगाने शहरातील अपंग बांधवांना रोजगार मिळावा, यासाठी घरघंटी, पिकोफॉल मशिन, शिलाई मशिन अशा वस्तूंचे वाटप अपंगांसाठी राखून ठेवलेल्या निधीतून केले जाणार आहे.यापूर्वी ज्या व्यक्तींना लाभ मिळालेला नाही, अशा अपंग व्यक्तींनी यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे विहीत मुदतीत अर्ज करावेत. जेणेकरुन या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत अपंग असल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत जोडावी, असे आवाहन चिपळूण पालिकेच्या मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, आरोग्य समितीच्या सभापती आदिती देशपांडे यांनी केले आहे. (वार्ताहर)
अपंगांना रोजगारासाठी मिळणार साहित्य
By admin | Published: November 02, 2014 9:43 PM