रत्नागिरी : पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट न घेतल्याने संतप्त मच्छीमार आणि मिऱ्यावासीयांनी थेट येथील शासकीय विश्रामगृहावर धडक देत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पालकमंत्री वायकर यांनी मिऱ्यावासीयांच्या शिष्टमंडळाची भेट घेत लवकरच आपले सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलनकर्ते शांत झाले.
रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या येथील मच्छीमारांनी बंधाऱ्याच्या मागणीसाठी तसेच एलईडी दिव्याने मासेमारी करणाऱ्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. त्यांचा हा लढा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे.त्याचबरोबर मिऱ्यांवासीयांचे अस्तित्व समुद्राच्या अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे. मिऱ्या समुद्रकिनारी बंधारा बांधावा, यासाठी अनेकदा शासनाकडे मागणी करुनही ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय संतप्त झाले असून, अनेकदा निवेदनांद्वारे मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मिऱ्यांवासीयांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.पालकमंत्री वायकर आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जयस्तंभ येथे आंदोलनकर्त्यांना भेट न दिल्याने मिऱ्यावासीय व मच्छीमार संतप्त झाले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने मच्छीमार व मिऱ्यावासीय यांनी थेट शहरातील शासकीय विश्रामगृहावर धडक दिली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची गाडीही अडवली होती. अखेर पालकमंत्र्यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला भेट दिली. पालकमत्र्यांनी एलईडीने सुरु असलेल्या मासेमारीवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.