जाकादेवी : ऑनलाईन बुकिंगमुळे इतर तालुक्यांबराेबरच परजिल्ह्यांतील नागरिकच लस घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार जाकादेवी प्राथमिक आराेग्य केंद्रात शुक्रवारी घडला़ केंद्रात आलेल्या १५० डाेसची मात्रा देण्यात आली; पण तिचा लाभ स्थानिकांना झालाच नाही़
जाकादेवी आरोग्य केंद्रात गुरुवारपर्यंत स्थानिकांची आरोग्य केंद्रात ऑनलाईन नावनोंदणी करून लस दिली जात होती. शुक्रवारी मात्र केवळ ऑनलाईन बुकिंग झालेल्या व्यक्तींनाच लसीच्या मात्रा देण्याच्या सूचना आल्या असल्याची माहिती जाकादेवी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश माेरतोडे यांनी पत्रकारांना दिली. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केले नाही, अशा लाभार्थ्यांनी ऑनलाईन बुकिंग करण्याचे आवाहनही डॉ. माेरतोडे यांनी केले.
आरोग्य केंद्रात २६ गावे समाविष्ट आहेत. या भागातील अशा केवळ आठ ते दहा स्थानिकांनाच लसीचा लाभ मिळाला. उर्वरित बाहेरगावातील नागरिकांना याचा लाभ झाला. स्थानिक लोक खेड्यापाड्यांत राहत असल्याने गावोगावी दुर्गम गावांतून ऑनलाईन बुकिंगची सोय उपलब्ध नाही. इंटरनेट नाही, लोकांना पुरेसे संगणकीय ज्ञान नाही. त्यामुळे प्रशासनाने ऑनलाईनबरोबरच स्थानिक पातळीवर लाभार्थ्यांना लसीची सोय करावी, अशी मागणी येथील खालगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष व माजी सैनिक मधुकर रामगडे, खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, ओरी गावचे उपसरपंच संकेत देसाई यांनी केली आहे.
जाकादेवी येथे लसीकरण केंद्रावर, सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवर पोलीस हेडकाॅन्स्टेबल व खालगावचे बीट अंमलदार किशोर जोशी तसेच पोलीस मित्र यांनी नियंत्रण आणले. लसीकरण पूर्ण होईपर्यंत बीट अंमलदार उपस्थित होते. ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेमुळे जाकादेवी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या २६ गावांतील ग्रामस्थांनी यापूर्वी ऑनलाईन बुकिंग केले नसल्यामुळे किंवा बुकिंग सेवेत अडथळा आल्याने जाकादेवी आरोग्य केंद्रात अपेक्षित लाभार्थी उपस्थित होते. जिल्ह्याच्या सर्व आरोग्य केंद्रांत स्थानिक लोकांसाठी राखीव डोसचा कोटा उपलब्ध करून देण्याची मागणी आता होत आहे. शासनाने ऑनलाईन बुकिंगचा आग्रह धरल्यास गावोगावी शासनानेच सायबर कॅफे किंवा ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.