राजापूर : तालुक्यातील बारसू - सोलगाव भागात एमआयडीसीसाठी आधीच अधिसूचना निघालेली आहे. तेथील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लगतची पाच किलाेमीटर परिसरातील जागाही एमआयडीसीमध्ये समाविष्ट करावी, अशी लेखी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. खाेट्या प्रचाराला बळी न पडता स्थानिकांनी प्रकल्पाची बाजू ऐकून घ्यावी व त्यानंतर जरूर तर आपला विरोध सुरू ठेवावा, असे आवाहन बारसू गोवळ दशक्रोशी प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हनिफ काझी तसेच सोलगाव - देवाचे गोठणे - नाटे प्रकल्प समर्थक समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.
रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात आल्यास त्याचा जनतेला किती फायदा होणार आहे, याचे शंभर सकारात्मक मुद्दे आहेत; मात्र प्रकल्प विरोधाचा ठेका घेतलेले पुढारी हे ग्रामस्थांनी प्रकल्पाची असलेली दुसरी बाजू ऐकूनच घेऊ नये, यासाठी आटापिटा करीत आहेत. तालुक्यातील जवळपास ६० ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प व्हावा, यासाठी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना पत्रे दिली आहेत. तीन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प हा केवळ पाच - सात प्रकल्प गावांसाठी नसून तो जोडीलाच तालुका व दोन्ही जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी आहे, याचे भान ग्रामीण जनतेला येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तब्बल साडेआठ हजार एकराची संमत्तीपत्रे असतानाही एनजीओंच्या खोट्या प्रचाराला बळी पडून चालणार येथील जनतेने हा प्रकल्प गमावला आहे. रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय, हे ज्यांना माहीत नाही, तेच आज या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका नजरेसमोर ठेवून प्रकल्पाला विरोध केला जात आहे; मात्र प्रकल्पविरोधकांनी कधीही विरोधाला उभ्या करणाऱ्या महिला-पुरुषांना रिफायनरीचे उत्पादन असलेले घरगुती गॅस सिलिंडर, डिझेल-पेट्रोल तसेच टुथब्रशपासून दैनंदिन वापरात असलेली असंख्य पेट्रोकेमिकल्स उत्पादने वापरायची सोडा अथवा बहिष्कार घाला, असे सांगितलेले नाही. कारण असे झाले तर ही जनता त्यांना समोरही उभी करणार नाही, असे म्हटले आहे.
कोकणातील भोळ्याभाबड्या जनतेचा उपयोग आणखी किती काळ केवळ राजकारणासाठी केला जाणार आहे, असा प्रश्न केला आहे. एनजीओ आणि प्रकल्प विरोधकांनी फार नाही किमान गेल्या दहा वर्षांत राजापुरातील किती घरांतील चुली पेटण्याचे काम केले, किती जणांना रोजगार दिले, कोकणचा कळवळा होता तर ही मंडळी गेली अनेक दशके मुंबईत वास्तव्याला का आहेत, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत.