रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर गणेशोत्सवानंतर सात दिवसांचे लॉकडाऊन होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती येणार नाही, याची दक्षता घ्या, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात दिला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागरिकांकडून आलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. मोठ्या शहरांप्रमाणे रत्नागिरीतही कोरोनाच्या अनुषंगाने अँटीबॉडी टेस्ट ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे.
त्यायोगे किती टक्के लोकांना याआधी कोरोना होऊन गेला आहे, याची माहिती होणार आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस अधिकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, दुकानदार, फेरीवाले, पत्रकार आदींची अँटीबॉडी टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या कार्यक्रमात सार्वजनिक गणेशमूर्तींचे आकार, मिरवणूक, विसर्जन आदींबाबतचे नियम, विलगीकरण, पुरोहितांबाबतची नियमावली, अँटिजेन टेस्टच्या किटचा पुरवठा, खासगी बसचे वाढते दर, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती आदींबाबत विचारलेल्या प्रश्नांचे निरसन या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.