शोभना कांबळे
रत्नागिरी : विविध उद्योग क्षेत्रात सध्या पुन्हा लाॅकडाऊन झाले आणि हाताचे काम गेले तर काय करायचे, ही भीती आहे. त्यामुळे आता कामगारांमध्ये गावी जावे की न जावे, ही संभ्रमावस्था आहे. तर मोठ्या मिनतवाऱ्या केल्यानंतर काही कामगार कामावर आलेत. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊनने सगळं ठप्प केले तर काय करायचे, व्यवसाय, उद्योग कसा करायचा, ही धास्ती विविध व्यावसायिक आणि उद्योजक यांना सतावत आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाले ते सलग जून महिन्यापर्यंत सुरू होते. जून महिन्यात काही उद्योग सुरू राहिले. मात्र, हाॅटेल, बांधकामे ठप्पच राहिली. हातचे काम गेल्याने उपासमार होऊ नये, यासाठी पर राज्यातील, पर जिल्ह्यातील कामगार आपल्या गावी परतले. त्यामुळे उद्योगांना मोठा फटका बसला. तर हाॅटेल, बांधकाम व्यावसायिकांचा सुमारे दहा महिने व्यवसाय बंद होऊनही त्यांची सोय करावी लागली. त्यामुळे या सर्व उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला तर कामगारांचीही उपासमार झाली.
हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?
गेल्या वर्षी लाॅकडाऊन १५ दिवसांसाठी करण्यात आले होते. मात्र, ते पुन्हा वाढत गेले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत उद्योग सुरू झाले नव्हते. काही कामगारांच्या हाताचे कामही गेले होते. आता पुन्हा लाॅकडाऊन झाले तर पुन्हा उपासमार होण्याची भीती वाटते. काम नसेल तर खाणार काय?- राजेशकुमार थापा, नेपाळ
गेल्या वर्षी बेळगावहून आलेले अनेक लोक काम थांबल्याने गावाला गेले. काहींना उद्योग सुरू झाल्यानंतर काम मिळाले. मात्र, आता पुन्हा लाॅकडाऊन झाले आणि काम थांबले तर मग हातात पैसे कसे येणार? पैसाच नाही आला तर कुटुंबाची गुजराण कशावर करणार?
- प्रकाश चाैहान,बेळगाव
सध्या तरी आम्हाला आम्ही ज्याठिकाणी काम करतो, तिथे रहाण्याची तसेच धान्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी लाॅकडाऊनची भीती वाटत नाही. पण गेल्या वर्षीसारखे अनेक महिने सर्व उद्योग बंद झाले तर हाताचे काम सुटले तर काय करायचे, ही भीती वाटत आहे.
- श्रीहरी चाैधरी , राजस्थान
कामगार गावी परतला तर...
सध्या तरी इतर राज्यातील कामगार काम करत आहेत, त्यांना लाॅकडाऊनची भीती वाटत नाही. त्यांच्यासाठी साईटवरच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही. मात्र, कामगार गावी गेले तर..ही भीती आहेच.- पी. एन. लाड, बांधकाम व्यावसायिक, रत्नागिरी
गेल्या लाॅकडाऊनमध्ये बहुतांशी कामगार त्यांच्या गावी परतले होते. त्यापैकी मध्यंतरी काही आले. त्यांच्यापैकी काही पुन्हा गेले. सध्या ५० टक्के कामगार कामावर आहेत. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन झाल्यावर तेही परत गेले तर उद्योगांवर परिणाम होण्याची भीती आहेच.
- दिगंबर मकदूम, उद्योजक, एमआयडीसी, रत्नागिरी
गेल्या लाॅकडाऊनमध्ये गावी गेलेल्या कामगारांना मोठ्या मिनतवारीने बोलावून घेतले होते. ते जानेवारीत परत आले. आता पुन्हा लाॅकडाऊन झाले, सर्व बंद झाले तर त्यांची पूर्णत: सोय करावी लागणार. अन्यथा ते पुन्हा त्यांच्या गावी परतण्याचा धोका आहेच.
- सुनीलदत्त देसाई,हाॅटेल व्यावसायिक, हातखंबा
गेल्यावर्षीची आठवण
- गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे बांधकाम सप्टेंबर महिन्यापर्यंत बंद राहिले. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक फटका बसला.
- गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे जून महिन्यापर्यंत मोठे उद्योग बंद राहिले. कामगार गावी गेले ते परतले नाहीत.
- गेल्या वर्षापासून हाॅटेल व्यवसायाला आर्थिक फटका बसला. कामगारांची शेवटपर्यंत सोय करावी लागली.