साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर या महामार्गावरील आंबा घाटात चार महिन्यापूर्वी सापडलेल्या मृतदेहामागचे गुपित आता उलगडले आहे. मृतदेहाच्या शर्टाच्या लोगोवरून पोलीस खुन्यांपर्यंत पोहोचले.
हा मृतदेह लांजातील प्रकाश भोवड यांचा असून, त्यांचा खून केल्याप्रकरणी लांजा येथील रूपेश कोत्रे आणि सतीश पालये या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.आंबा घाटात चक्रीवळणाजवळ दरीत ७ मार्च रोजी एक मृतदेह सापडला. हा खून असल्याचे स्पष्ट झाले. १२ मार्चला खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याची ओळख पटवण्यासाठी स्थानिक पातळीवर तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, विजापूर आदी ठिकाणी माहिती देण्यात आली.
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अंगावरील कपड्यांखेरीज एकही पुरावा नव्हता. मात्र, अंगावरील शर्टावर ह्यराज मुंबईह्ण असा लोगो मिळाल्याने ह्यराज मुंबईह्ण टेलर्सचा शोध सुरू झाला.
समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला. माध्यमांवर फिरणाऱ्या या माहितीमुळेच मृत व्यक्ती लांजा तालुक्यातील देवराई येथील असल्याचे व त्याचे नाव प्रकाश भोवड असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या नातेवाईकांनीही मृतदेह ओळखला.याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आले असून, त्यातील रुपेश कोत्रेवर वेगवेगळे चौदा गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक निशा जाधव पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधर, पोलीस हेडकॉन्स्टेबल भुजबळाव, दिनेश आखाडे, सुनील पडवळकर, पोलीस नाईक बरगल, तडवी, जोयशी व देवरुख पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा प्रकार उघडकीस आला.असा झाला होता खून, माहिती आली पुढे
खून झालेल्या व्यक्तीचे नाव लक्षात आल्यानंतर पोलीस तपासाला गती आली. प्रकाश शेवटचा त्याच्या ज्या मित्रांसोबत पाहिला गेला होता, त्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि लगेचच सर्व माहिती पुढे आली. लांजा शेवरवाडी येथील रुपेश दयानंद कोत्रे असे एका संशयिताचे नाव आहे. ४ मार्च रोजी त्याने प्रकाशच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार केला होता. त्यात प्रकाशचा मृत्यू झाला.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रुपेशला त्याचा मित्र सतीश चंद्रकांत पालये (कोंड्ये, पालयेवाडी ता. लांजा) याने मदत केली. ५ मार्चला या दोघांनी सतीशच्या चारचाकी गाडीने प्रकाशचा मृतदेह आंबा घाटात टाकला. त्याच्या खिशातील मोबाईल व इतर वस्तू दरीत टाकण्यात आल्या होत्या.