रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी आजवर राजकीय पक्षांना आणि त्यातही प्रमुख राजकीय पक्षांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे नेहमी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनता दल या पक्षांभोवतीच फिरत आहे. मतदारांनी या पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याने आजवरच्या १६ लोकसभांमध्ये ५७ टक्के उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली आहे.
अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी असते. सर्वच अपक्षांची अनामत रक्कम जप्त होते, हा आजवरचा अनुभव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार होते. अपक्षांची हीच सर्वात मोठी संख्या. रत्नागिरीमध्ये आजवरच्या १६ निवडणुकांपैकी दोनवेळा (१९५७, ७७) दुरंगी लढती झाल्या. दोनवेळा (१९७१, ९९) तिरंगी लढती झाल्या. तीनवेळा (१९५२, ६२, २००४) चौरंगी लढती झाल्या. १९६७, ८०, ८४, ८९, ९१, ९६, ९८, २००९ आणि २०१४ अशा नऊवेळा बहुरंगी लढती झाल्या आहेत. एकूण ८१ उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यातील ४६ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.
१९६७ सालची निवडणूक वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये विजयी आणि त्याच्याशी प्रमुख लढत झालेला पराभूत असे दोन उमेदवार वगळता इतर सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. १९६७ साली काँग्रेसच्या शारदा मुखर्जी आणि त्यांचे प्रमुख विरोधक भारतीय जनसंघाचे ए. जी. कळसकर यांच्याखेरीज केवळ के. जी. पवार हे एकमेव अपक्ष उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रमुख दोन उमेदवारवगळता इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
दोनवेळा दुरंगी लढत
१९५७ साली जनसंघाकडून प्रेमजीभाई आसर आणि काँग्रेसकडून जगन्नाथ भोसले तसेच १९७७ साली भारतीय लोक दलाचे बापूसाहेब परूळेकर आणि काँग्रेसकडून शामराव पेजे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती.
किती लागतात मते?
एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.