रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याची मुदत चार दिवसांवर आली असली तरी अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाकडे बड्या नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेवगळता एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा किंवा प्रचार दौरा या मतदारसंघात झालेला नाही. त्यामुळे अजूनही प्रचारात रंगत आलेली नाही.
दरवर्षी निवडणुकांचा डामडौल मोठा असतो. राज्यस्तरावरील नेत्यांच्या, स्टार प्रचारकांच्या सभा मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी होतात. त्यामुळे वातावरण ढवळून निघते. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी, विकासाचे मुद्दे यावर तावातावाने चर्चा होतात. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण लक्षात येते. मुळात आचारसंहितेचा खूप मोठा बाऊ झाल्यामुळे प्रचाराचे अनेक प्रकार बाजूलाच पडले आहेत. रिक्षातून, वाहनातून प्रचार केला जात नाही. बॅनर्स लावले जात नाहीत. त्यात गाजावाजा होतील, अशा प्रचार सभाच न झाल्यामुळे यावेळेच्या निवडणुकांमध्ये रंगतच आलेली नाही.
विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गुरूवारी या मतदार संघात प्रचार दौरा करणार आहेत. सकाळी ११.३0 वाजता देवरूख येथे आणि सायंकाळी ५ वाजता सिंधुदुर्गात त्यांची जाहीर सभा आहे. मात्र, उध्दव ठाकरेवगळता अन्य कोणत्याही राज्यस्तरीय नेत्याची सभा या मतदार संघात झालेली नाही. २३ एप्रिलला मतदान होणार असल्याने २१ एप्रिल रोजी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होईल. मात्र, पुढच्या तीन दिवसातही बड्या नेत्यांच्या सभांचे नियोजन नाही.
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरी मतदार संघात सभा होणार असल्याची चर्चा खूप आधीपासून सुरू होती. उध्दव ठाकरे यांच्यासोबतच तेही प्रचारासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा केली जात होती. मात्र, त्यांनी या मतदार संघाकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी सभेला येण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांच्या सभांचे नियोजन काटेकोर असल्यामुळे त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी वेळ देता आलेला नाही. भाजपकडून सुरेश प्रभू यांचाही प्रचार दौरा होणार असल्याची शक्यता होती. मात्र, त्यांच्याही तारखांबाबत समन्वय होत नसल्याने हा दौराही होण्याची शक्यता नाही.
रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग असलेल्या आणि रायगड मतदार संघात समाविष्ट असलेल्या खेडचे पर्यावरणमंत्री रामदास कदम शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. मात्र, त्यांचीही सभा रत्नागिरी मतदार संघात झालेली नाही. शिवसेनेकडे विद्यमान खासदारकी आहे, पाच आमदार आहेत, त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेकडे स्वत:ची अशी यंत्रणा आहे. काँग्रेसकडे विधान परिषद सदस्यवगळता खासदारकीपासून ग्रामपंचायतीपर्यंत काहीच नाही. तरीही काँग्रेसने या मतदार संघात एकही प्रचार सभा लावलेली नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा होतील, असे याआधी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या सभांचे अजून कोणतेच नियोजन नाही. आपण प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना एक सभा घेण्याचे निमंत्रण दिले असल्याचे बांदिवडेकर यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची सभा झालेली नाही.
शिवसेनेचा बालेकिल्ला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला आहेत. त्यामुळेच इतर पक्षांनी या मतदार संघाकडे दुर्लक्ष केले असल्याची चर्चा आहे. बालेकिल्ला असूनही उध्दव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे. इतर पक्षांनी आपल्या सभांकडे दुर्लक्ष केले आहे. स्वाभिमान पक्षाकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मात्र अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. अर्थात त्याखेरीज कोणीही बडे नेते या मतदार संघात आलेले नाहीत.
शेजारी आले, पण...
हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदार संघाकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेकजण काँग्रेसची साथ सोडून स्वाभिमानच्या वळचणीला गेले असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार लगतच्या गुहागर मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी येऊन गेले. मात्र, त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची बैठकही घेतली नाही किंवा ते इकडे फिरकलेही नाहीत.