एकदा मला पाण्यावर पाकळ्या तरंगताना दिसल्या. इतक्या पाकळ्या वाहत्या पाण्यात कुणी सोडल्या (टाकल्या म्हणवत नाही) ते मात्र कळलं नाही. इतकी वृक्षवल्लींची जत्रा असूनही माणसाचं अनादी एकटेपण रानात गेल्यावरच लक्षात येतं. आपण कुणीही नाही आणि क्षयभंगूर प्रसिद्धीची जी जळपटू आपण जोपासली त्यातही तथ्य नाही हे सत्य रानीवनी लक्षात येतं. अरण्यासारखी दुसरी पाळशाळा नाही. कोल्ह्यांना तुम्ही बालकथेत लबाड म्हणता, पण तोही कुटुंबवत्सल आहे. खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकड्याला शेपटीवर घेणारा आणि नंतर आपटून धोपटून मारणारा कोल्होबा जोखीम घेत असतो.
मी परवाच एका प्रामाणिक, सज्जन शिक्षकाला बोरकर सरांना म्हटलं, मुलांना फार पंखाखाली घेऊच नये. मुलांना रिस्क घ्यायला शिकवलं पाहिजे. नोकऱ्या आहेत कुठे? कर्जाची जबाबदारी घेऊन तरुणांना आता बिझनेस थाटावा लागेल. तोही असा असावा की साथीच्या रोगात सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवता येईल. रफटफ पोरेच यापुढच्या चक्रमचक्री काळात टिकाव धरतील. जे जे दुर्बल आहेत ते काळचक्रात नाहीसे होईल! मृत्यूनंतर जीवन नाही!
आत्मा हे केवळ मनाचं समाधान आहे. स्वर्ग, नरक नावाच्या जागा आकाश-अवकाशात कुठेही नाहीत. हे ज्याला विज्ञान खऱ्या अर्थाने कळतं तो सहज सांगू शकेल! बनावट थाट असणाऱ्या विद्वानांपासून विदुषीपासून मी नेहमीच दूर राहतो. ज्ञानी माणसाची संगत चांगली. काही अस्सल विज्ञानवादी अभ्यासक कोकणात आहेत. ते कॅमेऱ्यासमोर नसतात; पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो.
शहरात, सोसायट्यांमध्येही स्वार्थाचं द्वेषमत्सराचं जंगल आहेच.
ड्रग्ज, दारू आणि तंबाखूने समाज पूर्ण पोखरलेला आहे. ओव्हरस्मार्ट फोनशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. हे व्यसनच आहे. व्यसनांच्या जाळ्यातून तुम्ही मुलाबाळांना बाहेर काढणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी खऱ्या अरण्याकडे निसर्गसृष्टीकडे जावं लागेल. शेतीभातीत, मातीत लक्ष घालावं लागेल. शेतकरी जगवावा लागेल, तरच आपण जगू! जगणं हेच सर्वांत महत्त्वाचं आहे. आजचा अरण्यबोध इतकाच आहे!
माधव गवाणकर, दापाेली.