खेड : दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत खेड शहरातील शिवतर रोड परिसरातील योगायोग सोसायटीमध्ये राहणारे गणेश रमानाथ शेणॉय (६०) यांना दोघा ठकसेनांनी सोन्याची अंगठी, साखळी आणि दोन पाटल्या असे मिळून तब्बल ४४ हजार रूपयांना लुटल्याची घटना १२ मे २०१६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी १३ मे रोजी खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून, याप्रकरणी खेड पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शेणॉय यांच्या घराजवळ अंदाजे ४५ वर्षे वयाचे अनोळखी दोघे प्रौढ दुपारीच १२ वाजण्याच्या दरम्याने आले. दोघेही हिंदी भाषेत बोलत होते. सोने, चांदी व पितळेची भांडी व धातू स्वच्छ करून देतो, असे सांगू लागले़ यावेळी शेणॉय यांनी त्यांना पितळेचा तांब्या दिला़ हा तांब्या त्यांनी आपल्याकडील पावडर टाकून पॉलिश करून दिला़ यावेळी त्यांनी शेणॉय यांच्या पत्नीच्या पायातील चांदीचे पैंजण मागितले़ त्याप्रमाणे शेणॉय यांची पत्नी किशोरी यांनी पैंजण काढून दिले़ तेदेखील त्यांनी पॉलिश करून दिले़ त्यामुळे गणेश शेणॉय यांचा विश्वास बसला़ शेणॉय यांनी त्या दोघांकडे ओळखपत्र मागितले़ त्यावेळी या दोघांनीही आपल्याकडील ‘रॉयल प्लेट पावडर’ अशा मजकुराचे ओळखपत्र दाखविले़ या ओळखपत्राचा शेणॉय यांनी आपल्या मोबाईलवर फोटोही काढून घेतला़ त्यानंतर त्या दोघांनी सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली़ त्यानुसार शेणॉय यांनी आपल्या पत्नीच्या दोन सोन्याच्या पाटल्या, स्वत:ची २४ ग्रॅमची सोन्याची चैन आणि ८ ग्रॅम वजनाची नवरत्नाची अंगठी असे ४४ हजार रूपये किंमतीचे दागिने त्यांच्याकडे पॉलिश करण्यासाठी दिले़ यावेळी त्या ठकांपैकी एकाने शेणॉय यांच्या घरात येण्याची परवानगी मागितली़, तर दुसरा मात्र गेटवरच उभा होता़ एकाला शेणॉय यांनी परवानगी दिलीही़ त्यानंतर शेणॉय यांच्या पत्नीने गॅस पेटवला़ त्यावर कढई ठेवली़ व त्यामध्ये पाणी, त्यांच्याकडील पावडर व हळद टाकली. त्यामध्ये हे सर्व दागिने उकळण्यास टाकले. काहीवेळ गेल्यानंतर त्यांनी शेणॉय यांना ते दागिने चमच्याने काढूनही दाखविले़ आणि तेच दागिने पुन्हा त्या पातेल्यात टाकल्यासारखे केले़ त्यानंतर तो ठकसेन त्वरित घरातून निघून गेला़ तो तरूण लगबगीने घरातून बाहेर गेल्याने शेणॉय यांना संशय आला़ त्यांनी पातेल्यात पाहिले असता दागिने नव्हते. त्यांनी त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला. आपली फसवणूक झाल्याची त्यांची खात्री झाल्यानंतर १३ मे रोजी त्यांनी खेड पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
सोने पॉलिशच्या बहाण्याने लुटले
By admin | Published: May 14, 2016 12:09 AM