चिपळूण : महापुरामुळे चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भात, खते, बी- बियाणे आदी साहित्य निकृष्ट झाले आहे. नुकसानीचा पंचनामा विमा कंपनीकडून करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन अशोक कदम यांनी दिली.
पूरग्रस्तांना मदत
राजापूर : अखिल महाराष्ट्र खरेदी विक्री संघाचे नुकसान कुणबी सेवा संघातर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. सामाजिक बांधीलकी जोपासत असताना महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष रवी बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र मटकर, विलास पळसमकर, संकेत ठीक, सुभाष बांबरकर, सुधाकर मासकर यावेळी उपस्थित होते.
चैत्राली मराठेचे यश
देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे ऑनलाइन गीताईपठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी एकूण ३० जणांनी नावनोंदणी केली होती. ऑनलाइन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत चैत्राली मराठे हिने प्रथम क्रमांक मिळविला. वैष्णवी पुरोहित व ईश्वरी शेवाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
रानभाज्या महोत्सव
देवरूख : संगमेश्वर तालुका पंचायत समिती येथील रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शेतकरी महाराष्ट्र जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटातील महिलांनी रानभाजी नमुने तसेच त्यांच्या पाककृती प्रदर्शनात सादर केल्या. उद्घाटनासाठी सभापती जयसिंग माने, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर उपस्थित होते.
शंकर कोरवींची बदली
दापोली : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार शंकर कोरवी यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे बदली झाली आहे. २०१५ साली कोरवी दापोली येथे रुजू झाले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांची बदली दापोली येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयात करण्यात आली होती.
नागपंचमी साधेपणाने
देवरूख : तुळसणी येथील नागझरी मंदिरात नागपंचमी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनामुळे यावर्षी भाविकांना गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले होते. त्याचे पालन करीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाविकांनी दर्शन घेतले. प्रकाश लाड यांच्या हस्ते पूजा व अभिषेक करण्यात आला.
संपर्क अभियान राबविणार
लांजा : आगामी काळात पक्ष संघटना वाढ व मजबुतीकरणासाठी लांजा तालुक्यात संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय लांजा तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. तालुकाध्यक्ष शांताराम गाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
उत्स्फूर्त प्रतिसाद
लांजा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कृषी विज्ञान केंद्र आणि लांजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचायत समिती उपसभापती दीपाली दळवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १३ प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात मांडण्यात आल्या होत्या.