खेड : तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात तब्बल ५ हजार ३६२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.शेतात भाताच्या लोंब्या तयार झाल्या होत्या; परंतु अवकाळी पावसामुळे हे भातपीक शेतजमिनीत गाडले गेल्याने तयार भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. या अनुषंगाने खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा दिवस तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील शेतीची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले आहेत.
तालुक्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ९ हजार ९८१ हेक्टर ४० गुंठे क्षेत्र आले होते. यामधील १ हजार ५५६ हेक्टर १९ गुंठे क्षेत्र बाधित झाले आहे. या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात ३२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १४४ शेतकरी बाधित झाले आहेत.मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, एकूण १ हजार ५२४ हेक्टर १९ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले असून, तब्बल ४ हजार ६५६ शेतकरी बाधित झाले आहेत. दिवाळीच्या कालावधीत वादळी वारा व पाऊस यामुळे कापणीसाठी तयार झालेली पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही थोडेफार मिळेल, या आशेने पिकांची कापणी केली होती. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने कापणी केलेली पिके पाण्यात भिजून तरंगू लागली होती. ते भात आता जनावरांसाठीही निरूपयोगी झाले आहे.ओला दुष्काळभातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२०मध्ये घेतलेले कर्ज माफ करावे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. खेड तालुक्यातील २० शेतकऱ्यांचा ८ हेक्टर ९२ गुंठे क्षेत्राचा पीक विमा उतरवण्यात आला आहे. त्याची अमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा होत आहे.कर्जमाफीसह सरसकट भरपाईची अपेक्षाऑगस्ट महिन्यात संततधार पावसामुळे नदीकाठच्या चिंचघर, शिर्शी, भडगाव, खारी, नांदगाव, सुसेरी क्रमांक.१, सुसेरी क्रमांक २, बहिरवली, चिंचवली, उधळे, बोरघर आदी गावातील भातशेती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. शेतात आठ ते दहा दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजली होती. तेव्हाच्या नुकसानाचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.