असगोली : गुहागर तालुक्यातील असगोली - हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त घरात वीज शिरली. त्यामुळे घरामधील वायरिंग आणि स्वीच बोर्ड जळून खाक झाले. केबल टीव्हीच्या वायरमधून ही वीज अन्य घरांमध्ये जाऊन सुमारे १७ घरांमधील सेटटॉप बॉक्स आणि टीव्ही जळले आहेत. या घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. यावेळी जळलेली केबल पायावर पडून सुधीर कावणकर हे किरकोळ जखमी झाले आहेत.
गुहागर परिसरात मंगळवारी दुपारी १.३०च्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. त्यावेळी असगोली - हुंबरवाडीतील कावणकर यांच्या घराशेजारी नारळाच्या बुंध्यात वीज पडली. या विजेने माडाशेजारील दगड उडाला. तेथून ही वीज घरावर टाकलेल्या छपरांवर उडाली. या छपराखाली एक एलईडी दिवा होता. या दिव्याने वीज खेचून घेतली. एलईडी दिवा होल्डरसह फुटला आणि घरामधील सर्व वायरिंग जाळत वीज पुढे सरकत राहिली. स्वयंपाकघर, माजघर, दोन्ही बाजूच्या पडव्यांमधील चार खोल्या असे सर्व ठिकाणचे स्वीच बोर्ड व वायरिंग जळले. शेवटच्या खोलीत न्युट्रल वायरचा तुकडा पडल्याने तेथून वीज जमिनीवर पडली.
यावेळी जळलेल्या वायरचे काही तुकडे पडून सुधीर कावणकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेत कावणकर यांच्या घरातील ३५ हजाराचे वायरिंग जळून गेले आहे.
नारळाच्या बुंध्यात वीज पडताना त्या विजेचा स्पर्श केबल टीव्हीच्या ऑप्टिकल फायबर वाहिनीला झाला आणि क्षणार्धात ही वीज ऑप्टिकल फायबरच्या वाहिनीतून आजूबाजूच्या घरांपर्यंत पोहोचली. त्यामुळे जवळपास १७ घरांमधील टीव्ही आणि सेटटॉप बॉक्स बंद पडले. लगेचच वीज गेल्यामुळे आणखी किती टीव्ही नादुरुस्त झाले आहेत, ते समजलेले नाही. वीज वहन होत असताना ८० मीटरची ऑप्टिकल केबल आणि ४ ॲम्लिफायरही जळल्याने केबल ऑपरेटरचे ६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कावणकर यांच्या घरातील नुकसानाचा पंचनामा तलाठी व ग्रामसेवक यांनी केला आहे. अन्य नुकसानाची माहिती प्रशासन घेत आहे.