संत ज्ञानेश्वरांनी स्वतःला कोंडून घेतलं त्याचं कारण वेगळं होतं. आज आपल्या सर्वांवरही स्वतःला घरात कोंडून घेण्याची वेळ आलीय त्याच कारणही खूप वेगळं आहे. एका महाकाय पण डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूंनी ही परिस्थिती निर्माण केलीय. आणि या जीवघेण्या विषाणूंचं नाव आहे ‘कोरोना’. कोरोना हा एक असा विषाणू ज्याने सगळ्या जगावर राज्य केलंय, जगातलं कोणतंच राष्ट्र, कोणताच देश या कोरोनाला हरवू शकला नाही, जगभर थैमान घालणाऱ्या या विषाणूने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. डॉक्टर जेव्हा हतबल होऊन रुग्णाला वाचवण्यासाठी देवाचा हवाला देतात त्या देवाचे दार सुद्धा कोरोनाने बंद केले आहेत. आकाशाला गवसणी घालणाऱ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा कोरोनापुढे हात टेकले आहेत. संपूर्ण जग दुःखाच्या छायेत वावरत आहे, रक्ताची नाती दुरावली आहेत. या कोरोनाने आजपर्यंत इतके बळी घेतले आहेत़ त्यात काही मुलं पोरकी झाली, काहींच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले काही भाऊ बहीण कायमचे दुरावले. कोणाची पत्नी गेली तर कोणाचं सौभाग्य हरवलं. या कोरोनाने माणसामाणसात दरी निर्माण केली, दुरावा निर्माण केला.
हाच दुरावा आज शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात निर्माण झालाय. या कोरोनाने विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर केलंय. विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडलीय. शाळा म्हटली की एक प्रेमाचं, आपुलकीचं अतूट नातं जे आई आणि मूल यांच्यात असतं तेच नातं विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्यात आहे. पण त्या नात्यात दुरावा आलाय तो कोरोनामुळे. एप्रिलच्या वार्षिक परीक्षेनंतर चिमुकल्या पाखरांना वेध लागतात ते मे महिन्याच्या सुट्टीचे. आंबे, करवंद, जांभळं शोधत डोंगरातून , उन्हातान्हातून हिंडायचं, विहिरीत थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबायचं, पोहायचं, मामाच्या गावाला भाच्यांबरोबर गोट्या , लगोरी, क्रिकेट खेळण्याची स्वप्न पाहणारी ही चिमुकली आज चार भिंतीत कोंडली गेली.
पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चातक पक्ष्यासारखी शाळा विद्यार्थ्यांची व विद्यार्थी शाळेची वाट पाहत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चालू आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान देणे किंवा अध्यापन करणे ही शिक्षकांसाठी खरं तर एक कसोटीच होती. कारण ऑनलाईन शिक्षण घेताना देताना अनंत अडचणी विद्यार्थ्यांना शिक्षकांना येत होत्या परंतु प्रत्येक अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करण्याचे महान कार्य आजच्या महामारीच्या काळातही आपला शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
या ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कितपत प्रतिसाद देत आहेत ही गोष्ट निराळी. कारण आपल्या बाईंना, गुरुजींना वर्गात प्रत्यक्ष शिकवताना पाहून, कवितेच्या चालीवर नाचताना पाहून जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो तो आनंद या कृत्रिम शिक्षणातून नाही दिसत. शाळेत दररोज घेतल्या जाणाऱ्या परिपाठातून विविध संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये आपसूकच रुजवली जायची पण कोरोनामुळे केलेल्या संस्कारांचा मुलांना विसरच पडला आहे. सकाळच्या घणघणणाऱ्या शाळेच्या घंटेनी परिसरातील शांतता लोप पावायची आणि धावतपळत शाळेत येणाऱ्या चिमणी पाखरांच्या किलबिलाटानी शाळा गजबजून जायची पण, पण आज शाळेत गेलो तरी एक भयाण शांतता वाटते. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी सुट्टी आता कोणालाच नकोय. हातात पाटी पुस्तक घेऊन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज आई बाबांबरोबर हातात काठी घेऊन जनावरं राखताना पाहून मन हेलावून जातं.
असं म्हणतात की, प्रत्येक गोष्टीला अंत आहे मग या ‘कोरोनाचा’ अंत कधी होणार? वर्षभर घरी राहून कंटाळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत कधी येणार? या डोळ्यांना आतुरता आहे, आस आहे ती विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळा पाहण्याची़
हे ईश्वरा ,तुझ्याच रूपात आम्ही या चिमुकल्यांना पाहत असतो. म्हणूनच हात जोडून तुजला विनंती करतो ‘ लवकरात लवकर या कोरोनाचा नायनाट कर आणि आमच्या विद्यार्थीरूपी फुलांनी शाळेचा मळा बहरू दे.’
- सविता राजेश माळी
प्राथमिक शिक्षिका, लांजा