आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील कंपनीत स्फाेट हाेण्याचे प्रकार काही थांबत नसून, येथील समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये सहाजण गंभीररित्या भाजले असून, तिघांना मिरज येथे व अन्य तिघांना परशुराम हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.लाेटे औद्याेगिक वसाहतीमध्ये गेल्या दाेन महिन्यातील ही पाचवी घटना आहे. यापूर्वीही येथील कंपन्यांमध्ये स्फाेट हाेऊन कामगार दगावले आहेत. रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. काही क्षणार्धात कंपनीतून धुराचे लाेळ दिसू लागल्याने अनेकांची धावपळ झाली. स्फाेट झाल्यानंतर घटनास्थळी मदत ग्रुपसह अग्निशमन दल रवाना झाले हाेते. स्फाेटानंतर लागलेल्या आगीमुळे महामार्गावर धुराचे लाेळ दिसत हाेते. घटनास्थळी खेड येथील अग्निशमन बंबही दाखल झाला हाेता.
या घटनेनंतर कंपनींमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी येथील घरडा केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन पाच कामगारांचा बळी गेला हाेता. त्यानंतर रविवारी समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कंपनीत कामगारांना याेग्य सुरक्षा पुरविल्या जातात की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.