लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा ‘अपरान्त भूषण’ हा पुरस्कार लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि चिपळूणच्या सुकन्या सुमित्रा महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे. संचालक मंडळाने एकमताने यावर्षी सुमित्रा महाजन यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे.
विशेष म्हणजे १२ एप्रिल हा सुमित्रा महाजन यांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसाची कोकणवासीयांकडून आनंदभेट म्हणून वाचनालयाने पुरस्काराची घोषणा केली आहे. सुमित्रा महाजन यांची ६ जून २०१४ राेजी सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या कार्यकाळात लोकसभाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने ठसा उमटविला आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष, नाटककार अरविंद तथा अप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येतो. कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी होताच पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, माजी अध्यक्ष अरुण इंगवले, उपाध्यक्ष राष्ट्रपाल सावंत आणि कार्यवाह धनंजय चितळे यांनी सांगितले.