लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत दोन महिन्यात घडलेल्या लागोपाठच्या चार घटनांनी वसाहतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातांमध्ये होणारी मनुष्यहानी, त्यामुळे परिसरातील लोकांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार आणि नुकताच घरडा कंपनीत झालेला स्फोट यामुळे लोटे खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न लोकांच्या मनात पुन्हा येऊ लागला आहे.
साधारणपणे १९८६ / ८७ च्या दरम्यान लोटे परशुरामच्या मोकळ्या माळावर लोटे औद्योगिक वसाहतीची सुरुवात झाली. काही मोजकेच कारखाने वगळता अन्य परिसर मोकळा होता. मात्र, येथील हवा, पाणी, जमिनीचा अभ्यास करून येथे हळूहळू एक एक कारखाना येऊ लागला. संपूर्ण रासायनिक कारखानदारी असलेली वसाहत म्हणून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीची ओळख राज्यभर झाली. रासायनिक कारखानदारीमुळे साहजिकच येथे छोटे मोठे अपघात घडू लागले.
या वसाहतीमधील बहुतांश कंपन्यांमध्ये छोटे मोठे अपघात झाले. कधी या अपघातांचे स्फोटात रुपांतर झाले, तर कधी आग लागण्यात. या प्रकारांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. नुकत्याच घरडा कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला. घरडा कंपनीत याआधीही १९८९, १९९४ या कालावधीत स्फोट घडले होते. त्यातही काही कामगारांचा बळी गेला आहे.
स्फोट व बळींचा विचार करता केवळ घरडा कंपनीच नाही तर एक्सेल, सुप्रिया लाईफ सायन्सेस, श्रेयस इंटरमिडीएटस् विनती, रिव्हरसाईड, पेन्टोकी, पुष्कर, हिंदुस्थान युनिलिव्हर व अन्य काही कंपन्यांमध्येही असे प्रकार घडले आहेत. २६ जानेवारी २००९ रोजी येथील एक्सेल कंपनीत झालेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला होता. सुप्रिया कंपनीतही असे अपघात घडून काहींनी आपला जीव गमावला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत टाकीत पडून चिटणीस नामक कामगाराचा बळी गेला आहे, तर पेन्टोकी कंपनीत कोळच्या बॉयलरमधील पट्ट्यात अडकून एका आदिवासी कामगाराचा मृत्यू झाला आहे. याच कंपनीत मान्सून शेडवर काम करताना गुणदे येथील एका स्थानिक कामगाराचा बळी गेला आहे. पुष्कर, श्रेयस, स्नेहलता, सहस्र केमिकल्स, रिव्हरसाईड या कंपन्यांमधूनही असे प्रकार घडले आहेत.
झालेल्या दुर्घटना हे जरी ‘अपघात’ असले तरी त्यातून झालेले नुकसान खूप मोठे आहे. अनेक कुटुंबांचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. या अशा अपघातांमुळेच लोटे परिसराच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.