चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात १४ शतकातील विष्णूमूर्ती दाखल झाली.लांजा तालुक्यातील कांटे गावात पुरातन लक्ष्मी केशव मंदिर आहे. आठ वर्षापूर्वी मंदिरातील मूर्ती भंगली असल्याने नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रथा व परंपरेप्रमाणे जुनी मूर्ती जलाशयात विसर्जित करण्यात आली होती. मंदिरातल्या जुन्या मूर्ती हा इतिहास असतो. या मूर्ती शिल्पावरुन तिचा काळ समजतो. अशा अनेक मूर्ती व वस्तूंनी हे संग्रहालय समृध्द आहे. मात्र दुर्दैवाने रुढी व परंपरा सांगता अशा मूर्ती विसर्जित करुन आपण तो इतिहास काळाआड करत आहोत हे भान विसरतो.
अनेक मंदिरातील अशा इतिहाससाक्षी मूर्ती नदी सागरात विसावल्या. मात्र चिपळुणच्या संग्रहालयाची माहिती लोटिस्माचे कार्यवाह विनायक ओक यांनी कांटे येथील व सध्या चिपळूण येथे प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या अनिल धोंड्ये यांना सांगितली. त्यांनी कांटे मंदिरातील विसर्जित मूर्ती नदीच्या डोहातून काढून संग्रहालयाला द्यायला मान्यता दिली. कांटे येथील ग्रामस्थांनीही मान्यता दिल्यानंतर ही मूर्ती संग्रहालयाला देण्यात आली.ही मूर्ती विष्णूची असून १४ व्या शतकातील असावी असे मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आशुतोष बापट यांनी सांगितले. अशा मूर्ती विसर्जित न करता लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला द्याव्यात असे आवाहन लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी केले आहे.