या केंद्रावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्टाफ नर्स भावना कुलकर्णी, श्वेता तारिये, डेटा एंट्री ऑपरेटर सुजाता डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, सुरक्षा रक्षक प्रथमेश डोंगरे लसीकरणाची धुरा सांभाळत आहेत. या केंद्रांवर हेल्पिंग हँडस्मध्ये समावेश असलेले लायन्स क्लबचे ओंकार फडके, तसेच पराग पानवलकर, श्रेया केळकर, श्रीपाद केळकर, प्रमोद खेडेकर ही टीम लसीकरण सुरळीत होण्यासाठी सहकार्य करीत आहे. त्यामुळे या केंद्रावरही अतिशय शांततेत लसीकरण सुरू होते.
अपर पोलीस अधीक्षकांची भेट
रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी या केंद्राला भेट देत काही अडचण आहे का, अशी विचारणा केली, तसेच काही सहकार्य हवे असल्यास ते पोलीस यंत्रणा सदैव करील, असे सांगितले. यावेळी लायन्स क्लबचे ओंकार फडक यांनी सकाळच्या वेळी नागरिकांची गर्दी होत असल्याने काही वेळा वादाचा प्रसंग येतो, त्यामुळे सकाळी दोन तास पोलीस मिळाल्यास कटू प्रसंग टळेल, असे सांगितले. यावर देसाई यांनी हे मान्य केले, तसेच प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहन केले. या लसीकरण केंद्रावर देसाई मॅडम प्रत्येक दिवशी भेट देऊन चाैकशी करतात, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.
परिसर निर्जंतुक
या केेंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाविषयक खबरदारीचे पालन करून येणाऱ्या नागरिकांचे तापमान तपासले जात होते, तसेच लसीकरण संपल्यानंतर परिसर निर्जंतुक करून घेण्यात आला होता. हा परिसर मोकळा असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्यरीत्या केले जात असल्याचे दिसून आले.