राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे श्रीराम गॅस एजन्सी एल.पी.जी. सुविधा केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती करुणा कदम यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजापूर तालुक्यात अशाप्रकारचे हे पहिलेच सुविधा केंद्र आहे. यावेळी विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
अनुदान रखडलेले
राजापूर : राजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मागील तीन महिन्याचे अनुदानच न मिळाल्याने निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील निराधार स्त्री-पुरुषांना श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना व संजय गांधी निराधार योजनेमार्फत प्रतिमहिना आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते. तालुक्यात या योजनेचे तीन ते साडेतीन हजार लाभार्थी आहेत.
पर्यटनमंत्र्यांना साकडे
राजापूर : पर्यटन खात्याच्या माध्यमातून आंबा ते विशाळगड रस्त्याचे डांबरीकरण, रोपवे, जीर्ण लोखंडी शिडीच्या जागी स्टील शिडी बसविणे अशा मागण्या राजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सरफराज काझी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. याठिकाणी सोयीसुविधा लवकरात लवकर व्हाव्या, अशा स्वरूपाचे पत्र दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी विशाळगडचा दौरा करून समस्यापूर्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.
अजून भरपाई नाही
राजापूर : अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन केलेली माती ‘जैसे थे’ ठेवल्याने शेती न करता आलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी एकही पैसा न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बऱ्याच ठिकाणी आंबा काजू व कुंपणाचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या मोबदल्यापासून शेतकरी आजही वंचित आहेत. याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
वार्षिक सभा उत्साहात
खेड : दिवाण दासूर मस्जिद ट्रस्ट, कौचाली-पटेल मोहल्ल्याची वार्षिक सभा सिराज पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ट्रस्टचे महंमद ढेणकर, अब्दुल कौचाली, हुसैनमिया कौचाली यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या रिक्त जागी फिरोज ढेणकर, अब्दुल वहिद हुसैनमिया कौचाली यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली. सूत्रसंचालन अब्दल्लाह ढेणकर, तर आभार प्रदर्शन अहमद कौचाली यांनी केले.
नाभिक पतसंस्थेची सभा
खेड : भरणे येथील श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. या सभेत लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करणे, नफा वाटणी व लाभांशाला मंजुरी देणे, मंजूर अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तसेच विविध विषयांवर चर्चा करणे, हे विषय होणार आहेत. या ऑनलाईन सभेत जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे यांनी केले.
पथदीप बंद
खेड : खेड-भरणे मार्गावरील छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते शिवाजीनगर परिसरातील पथदीप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे पथदीप चालू करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्न करत नसल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. हा मार्ग सतत पादचाऱ्यांमुळे गजबजलेला असतो. मात्र, या मार्गावरील पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंंद असल्याने विशेषत: रात्रीच्या सुमारास पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. लवकरात लवकर पथदीपांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.