लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील मुल्ला मोहल्ल्यातील लब्बैक कमिटीने चिपळुणातील सुमारे ४५० पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. इतकेच नव्हे तर आर्थिक मदतीसह पूरग्रस्तांच्या आरोग्याची मोफत तपासणी केली व औषधेही दिली. माणुसकीच्या नात्याने सामाजिक ऋणानुबंधनातून या कमिटीने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.
दीड महिन्यापूर्वी चिपळुणात अतिवृष्टी आणि महापुरामुळे व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरपरिस्थिती गांभीर्याने लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चिपळुणात मोठ्या प्रमाणात मदत आली. यामध्ये सावर्डे येथील मुल्ला मोहल्ल्यातील लब्बैक कमिटी मागे राहिली नाही. चिपळुणात पुरामुळे घरांत-दुकानांत पाणी शिरून चिखलमय परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या कमिटीच्या सदस्यांचे हात सर्वप्रथम स्वच्छता मोहिमेसाठी सरसावले. यामुळे पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांची घरे व दुकाने स्वच्छ होण्यास मदत मिळाली. त्यानंतर कमिटीच्या सदस्यांनी पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याच्या हेतूने सर्वेक्षण केले व त्यांना खरोखरच गरज आहे अशा पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचा निर्णय घेतला. यानुसार चिपळुणातील खेर्डी-भुरणवाडी, पेठमाप, शंकरवाडी, गुढेकरवाडी, पिसेचाळ आदी परिसरात ४५० पूरग्रस्तांना किचन किटचे वाटप करण्यात आले. यामुळे पूरग्रस्तांना काहीप्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली.
लब्बैक कमिटीचे अध्यक्ष मजिद मुल्लाजी, उपाध्यक्ष गुलजार गोलंदाज, फैज खान, तहसीम मुल्लाजी, अरबाज मुल्लाजी, हनिफ गोलंदाज, सद्दाम शेख, मुनीर मुल्लाजी, बाशीद मुल्लाजी, मोहसीन गोलंदाज, असलम काद्री, मुजीब कादरी, तौफिक मुल्लाजी, परवेज मुल्लाजी, मुजीब पटेल, तौफिक काद्री, इफराज काद्री, अझर गोलंदाज, अदनान गोलंदाज, जिशान शेख, तौहीद काद्री, आतिक मुल्लाजी, साकीब खान, नवेद मुल्लाजी, शादाब काद्री, सुहेल काद्री, नवमान पटेल, अरफान काद्री, अमीर शेख आदींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मेहनत घेतली.