लांजा : शहरातील सौरभ विनायक लिमये याने एम.डी. (मेडिसिन) या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवीत दैदिप्यमान यश मिळवत के. ई. एम. मेडिकल काॅलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
मुंबईतील जी. एम. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटल मुंबई या कॉलेजला सौरभ हे उच्च शिक्षण घेत होता. त्याने एम. डी. (मेडिसिन) मध्ये ७२.२५ टक्के गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सौरभ हा लांजातील प्रसिद्ध डॉ. य. दा. लिमये यांचा नातू असून, त्याचे वडील विनायक लिमये यांचे मेडिकल स्टोअर आहे.
यावेळी सौरभ लिमये ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला की, मला एम. डी. मेडिसिन ही पदवी मिळाली आहे. परंतु अजून पुढे जाऊन डॉक्टरेट इन मेडिसिन अशी सुपर स्पेशालिटी डिग्री करण्याचा माझा मानस आहे. मुंबई - पुणे सारख्या महानगरापेक्षा रत्नागिरी सारख्या ऐतिहासिक जिल्ह्यात येऊन पुढील वैद्यकीय व्यवसाय सुरु करण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील जनतेची सेवा माझ्या हातून झाली तर मला खूप आनंद होईल. ह्युमन सायन्सचा सखोल अभ्यास करणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.