चिपळूण : गोवा बनावटीची कोट्यवधी रुपयांची दारू घेऊन बेकायदा वाहतूक करणाऱ्या ७ जणांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार असून, हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ जण असल्याने या तस्करीचा मास्टरमाइंड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे.
गोव्याहून थेट नाशिक येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कुंभार्ली घाटात सापळा रचून पकडला. या ट्रकमध्ये १३५० बॉक्स गोवा बनावटीची दारू आढळली. तसेच दोन चारचाकी गाड्यांही त्यांच्याबरोबर असल्याचे समोर आले. हा सर्व मुद्देमाल तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा होता. या प्रकरणाची अत्यंत जलद पद्धतीने चौकशी करण्यात आली. तेव्हा या प्रकरणात ७ जणांचा समावेश असल्याचे समोर आले. त्यापैकी दोघेजण हे परप्रांतीय आहेत, तर ५ जण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करून न्यायालयाने त्यांना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी चिपळुणात लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला होता. त्याचा सूत्रधार देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातच होता. आता गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडेच संशयाची सुई जात असल्याने त्याअनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच गोव्याहून ट्रक भरून जर बेकायदा दारू वाहतूक होत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या सीमेवर त्याची तपासणी झाली की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
----------------------
ट्रकमध्ये प्लायवूडची खास पेटी
प्रत्यक्षात ज्याप्रमाणे ट्रकमध्ये प्लायवूड मजबूत पेटी बनवण्यात आली होती. त्यापेटीत दारूचे बॉक्स होते. ते पाहता पूर्ण प्लॅन करून ही तस्करी करण्याचा प्रयत्न होता, असे प्रथमदर्शनी समोर येत असल्याने यामागे एक मोठे रॅकेट असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गोवा दारू तस्करीचा हा प्रयत्न पहिलाच होता की, यापूर्वीही अशा प्रकारे तस्करी सुरू होती. याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच हा ट्रक हा मुंबई - गोवा महामार्गावरून पोलादपूर मार्गे जाणार होता; परंतु अचानक त्याने मार्ग बदलला. त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.