रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी व उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध झाली. सभापतीपदी दापोलीतील कॉँग्रेसचे नेते मधुकर दळवी तर उपसभापतीपदी राष्टÑवादी कॉँग्रेसचे शौकत माखजनकर यांची निवड झाली. आधीचे सभापती गजानन पाटील यांनी पदाचा राजिनामा दिल्याने ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत १८ पैकी ७ जागांवर सदस्य निवड बिनविरोध झाली होती. ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर १८ जागांपैकी राष्टÑवादी ७, सेना ५, कॉँग्रेस ४ तर भाजप २ असे पक्षीय बलाबल होते. निवडणूकीनंतर सर्वच पक्ष सदस्यांची मोट बांधण्यात रत्नागिरी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या या निवडणुकीत सर्वानुमते सभापतीपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली होती. अलिकडेच गजानन पाटील यांनी अन्य सदस्यांना संधी देण्यासाठी या पदाचा राजीनामा दिला होता.
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी सभापतीपदासाठी मधुकर दळवी तर उपसभापतीपदासाठी शौकत माखजनकर यांची नावे सुचवली. राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी या नावांची घोषणा केली. या पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.