खेड : योग विद्या गुरुकुल, नाशिक व पारस उद्योग समूह, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने १ जुलैपासून मोफत जल नेती अभियान राबविण्यात येत आहे. सातव्या जागतिक योग दिनानिमित्ताने आयुष मंत्रालय भारत सरकारने योगा फॉर वेलनेस अर्थात निरोगीपणासाठी योगाभ्यास असे घोषित केले आहे. त्या अनुषंगाने कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी एक लाख लोकांना मोफत जलनेतीचे प्रशिक्षण द्यावयाचे असा योग विद्या गुरुकुल, नाशिक संस्थेचा मानस आहे.
राज्यात मोफत जलनेती प्रशिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत पोलीस, शिक्षक, विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था व सहकारी सोसायट्या यामधून सुमारे एक हजार लोकांना प्रशिक्षण दिलेले आहे. यासाठी लागणारे नेतीपात्र अहमदनगर येथील पारस उद्योग समूहाचे संतोष बोथरा यांच्याकडून मोफत देण्यात येत आहेत.
पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कर्मचारी दररोज जलनेती करतात. जलनेती पात्र मोफत आहे आणि प्रशिक्षणही मोफत आहे. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी या जलनेती अभियानामध्ये सहभागी व्हावे. ६ ते १० लोकांचा समूह असेल तर तुम्ही सांगाल त्याठिकाणी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण रोज अर्धा तास असणार आहे. हे प्रशिक्षण तीन दिवसच असणार आहे. अधिक माहितीसाठी सुनीता जोशी, स्मिता वैद्य, डॉ. मधुरा बाळ, डॉ. श्याम गिल्डा, नम्रता दामले, मीरा चिखले, रोशनी तलाठी, श्रद्धा सोहोनी, मानसी जोशी, कृत्तिका धामणकर व श्रावणी बांदिवडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.