दापोली : दापोली येथील कै. कृष्णमामा महाजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्त ग्रुप सूची तयार करण्यात आली आहे. तसेच या रक्त ग्रुप उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन अर्ज भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कोरोना महामारीचे भयानक संकट संपूर्ण मानवजातीला त्रस्त करणारे ठरले आहे. आतापर्यंत आलेल्या कोरोनाच्या दोन लाटांमुळे संपूर्ण देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेक वेळा या रोगाच्या लाटेदरम्यान रक्ताचा तुटवडा भासतो आहे. तसेच या कठीण प्रसंगात रक्तदानाचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. अनेकदा रक्तदात्याची गरज असताना आपल्या परिचित व्यक्तींचा रक्तगट माहीत नसतो. यासाठी सहजगत्या रक्तगट आणि रक्त उपलब्ध व्हावे याकरिता महाजन प्रतिष्ठान संपूर्ण रक्तगट सूची तयार करण्यात आली आहे.
या सूचीमध्ये तालुका, गाव, आवश्यक रक्तगट असे शोधल्यास आपापल्या परिसरातील रोग्य रक्तदात्यांची नावे समोर येतील. विशेषत: शहरी भागाबरोबरच ग्रामीण रुग्णांनाही याचा चांगला फायदा होणार आहे. यामध्ये जेवढे अधिक सुजाण नागरिक अर्ज भरतील तेवढी रक्ताची उपलब्धता सुलभ होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी हा गुगल फॉर्म भरून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी केले आहे.