राजापूर (जि. रत्नागिरी) : राजापुरात महामुंबई निधी अर्बन बँकेने चारजणांना साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूवी उघड झाला हाेता. या बँकेने तालुक्यातील आणखी एकाला नऊ लाख दहा हजाराला गंडा घातल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी राजापूर पाेलिस ठाण्यात मुंबईतील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणूकप्रकरणी मनेश सखाराम कांबळे (रा. सोलगाव, ता. राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महामुंबई निधी अर्बन बँकेच्या राजापूर शाखेतील मंगेश महादेव जाधव, सागर रिकामे, मयूर पाटील (सर्व रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी महामुंबई निधी अर्बन बॅंकेत गुंतवणूक केली तर त्या बदल्यात जास्त परतावा मिळेल, असे मनेश कांबळे यांना सांगितले. त्याचबराेबर इतर गुंतवणूकदारांनाही जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी गुंतवणूक स्वीकारली. गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारून तक्रारदार व इतर गुंतवणूकदार यांनी गुंतविलेल्या रकमेचा परतावा विहीत वेळेत न देता आर्थिक फसवणूक केल्याचे समाेर आले आहे.
महामुंबई बँकेचा आणखी एकाला नऊ लाखांचा गंडा, राजापुरात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 4:00 PM