मनोज मुळये रत्नागिरी : एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उमेदवारांनी कोणताही खंड पडू न देता प्रचार सुरूच ठेवला आहे.गत सप्ताहात पावसाने हजेरी लावली असली तरी या आठवड्यात पावसाची शक्यता कमीच आहे. आता ऑक्टोबर हीटचा प्रभाव वाढू लागला आहे. १४पासून सुरू झालेल्या या आठवड्यात तापमानाचा पारा ३० अंशाच्या पुढेच गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या मानाने हे तापमान अंगाची लाहीलाही करणारे आहे.उन्हाच्या कडाक्यातच उमेदवारांचा प्रचार वाढत चालला आहे. २१ रोजी मतदान असल्याने आता मोजकेच दिवस हातात राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारानेही टोक गाठले आहे. यावेळी सर्वच पक्षांनी जाहीर सभांपेक्षा वाडीवाडीत ग्रामस्थांना जाऊन भेटण्यावरच भर दिला आहे. त्यामुळे या उन्हाचा चांगलाच सामना उमेदवारांना करावा लागत आहे. उष्णता वाढल्याने काही उमेदवारांना खोकल्याचाही त्रास सुरू झाला आहे. मात्र औषधोपचार घेत प्रचाराला गती दिली जात आहे.रात्री दहा वाजता प्रचार संपल्यानंतरही कार्यालयात बसून दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या प्रचाराचा आढावा घेणे आणि दुसऱ्या दिवशीचे नियोजन करणे सुरू असते. त्यामुळे पुरेशी विश्रांती नाही, अशी स्थितीही उमेदवारांची झाली आहे.दोन दिवस तापमान ३४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यातही सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत तापमान ३१ अंशाहून जास्त असेल. या वेळात प्रचाराची तीव्रता वाढते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे.समुद्रकिनाऱ्यावर असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच घाम अधिक येतो आणि त्याने थकवा लवकर येतो. आता प्रचार करणाऱ्यांसमोर हाच प्रश्न मोठा आहे. लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात झाल्या होत्या. तेव्हाही उन्हाच्या झळा अशाच वाढल्या होत्या. अर्थात त्यावेळी तापमान ४० अंशापेक्षा अधिक होते. त्यामानाने आता उष्मा कमी आहे.
Maharashtra Assembly Election 2019 : गरमागरमीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:52 PM
एका बाजूला निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना दुसरीकडे उन्हाचा कडाकाही वाढू लागला आहे. त्यामुळे प्रचाराच्या ताणामुळे आधीच घामाघूम झालेले नेते आणि कार्यकर्ते आता उन्हाच्या तडाख्यानेही हैराण झाले आहेत. अर्थात हा प्रचाराचा शेवटचाच आठवडा असल्याने सर्वच उमेदवारांनी कोणताही खंड पडू न देता प्रचार सुरूच ठेवला आहे.
ठळक मुद्देऑक्टोबर हीटचा तडाखा, कार्यकर्त्यांसह नेतेही झाले घामाघूमलोकसभेप्रमाणेच विधानसभेचा प्रचारही घाम फोडणारा