रत्नागिरी : शिवसेनेच्या नेत्यांनी बोलतांना आपण युतीने निवडणूक लढवतोय याचे भान ठेवून भाजप नेते उमेदवार यांचेवर टिका करण्याचे टाळणे आवश्यक आहे. भाजपचे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी. कोणतीही वाईट टिका भाजपच्या कोणत्याही नेत्यावर यापुढे खपवून घेतली जाणार नाही.
भाजपचे नेतृत्वावर टिका झाल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रचारावर होतील, असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.शिवसेना नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या टीकेला भाजप जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी प्रत्युतर दिले आहे. त्यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत. शिवसेनेने भाजप कार्यकर्ते, त्यांचे नेतृत्व याचा मान राखलाच पाहिजे. परजिल्ह्यातील वाद रत्नागिरीमध्ये आणून येथील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता शिवसेनेने घ्यावी.युती असल्याने रत्नागिरीमध्ये एकही जागा न मिळताही भाजप कार्यकर्ते मोठ्या मनाने युतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र, त्यांच्या भावनांचा अवमान होणार असेल तर विचार करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे राजापूर सभेतील वक्तव्याने व्यथित असून, याची दखल शिवसेनेने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नारायण राणे हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर या जिल्ह्यात टीका करून चांगले वातावरण बिघडवण्यापासून शिवसेनेने स्वत:ला आवरावे. या जिल्ह्यात नसलेला विषय या प्रचार सभांमध्ये आणू नये, असे पटवर्धन यांनी परखडपणे शिवसेना नेतृत्वाला सांगितले आहे.