- मनाेज मुळ्येरत्नागिरी - उद्धवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले भास्कर जाधव तब्बल सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत महायुतीमधील शिंदेसेनेच्या राजेश बेंडल यांच्याशी होत आहे. महाविकास आघाडीचा अनुभवी उमेदवार आणि महायुतीचा नवखा उमेदवार असा सामना असला तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही लढत औत्सुक्याची ठरणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पाचवेळा आमदार होण्याचा मान माजी मंत्री रामदास कदम, सूर्यकांत दळवी आणि भास्कर जाधव या तिघांनी मिळवला आहे. यातील रामदास कदम आणि दळवी आता रिंगणात नाहीत. पण जाधव अजूनही रिंगणात आहेत. १९९५ साली ते प्रथम आमदार झाले. २००४ साली शिवसेना सोडल्यानंतर अपक्ष म्हणून एकदाच पराभूत झाले. मात्र त्यानंतर पक्ष आणि मतदारसंघ बदलूनही सलग तीन निवडणुका ते जिंकले आहेत. त्या तुलनेत राजेश बेंडल विधानसभेच्या रिंगणात नवखे आहेत. मात्र ते महायुतीचे उमेदवार असल्याने लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे- १९८० मध्ये आमदार असलेल्या रामचंद्र बेंडल यांची पुण्याई पाठीशी घेऊन त्यांचे सुपुत्र राजेश बेंडल रिंगणात उतरले आहेत. विधानसभेला ते प्रथमच उभे राहिले आहेत.- विधानसभेसाठी नवखे असले तरी राजेश बेंडल थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांनी आपल्या आघाडीचे १७ पैकी १६ नगरसेवक निवडून आणले आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.- गुहागर तालुक्यात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीत कुणबी समाजाचे नेतृत्त्व राजेश बेंडल यांच्याकडे आहे. त्यातून ते जाधव यांना लढत देऊ शकतात.- भास्कर जाधव यांनी मतदारसंघ बदलल्यानंतरही सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे या लढतीत अधिक रंगत येणार आहे.