काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड पक्षातून निलंबित; कारवाईवर लाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..
By अरुण आडिवरेकर | Published: November 11, 2024 06:16 PM2024-11-11T18:16:57+5:302024-11-11T18:18:44+5:30
राज्यातील २८ नेत्यांवर कारवाई
रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघात पक्षादेश डावलून बंडखाेरी करणाऱ्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील २८ नेत्यांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे.
काँग्रेसने महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार बंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षशिस्त भंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे परिपत्रकाद्वारे दिली आहे.
कारवाईची चिंता नाही
निवडणूक असल्यावर ताे एक पक्षाचा भाग असताे. आघाडीचा धर्म पाळावा लागताे. आमची लढाई काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी हाेती. पक्षाकडून मला तिकीट मिळावे, अशी मला अपेक्षा हाेती. मला कारवाईची चिंता नसून माझी भूमिका पक्षाला पटवून देईन, असे अविनाश लाड यांनी पक्षाच्या कारवाईनंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना सांगितले.