गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, त्या सर्वांना मागे टाकून महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. जगभरात मी जो विकास पाहिला आहे, तो मला कोकणात करून कोकण सुंदर करायचे आहे. यासाठी निवडणुकीनंतर मी कोकणात येणार आहे, असे उद्गार राज ठाकरे यांनी काढले.गुहागर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांच्या प्रचारार्थ पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणात झालेल्या सभेत ते बोलत होते.राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही कोकणात राहणारे भाग्यवान आहात, इतका चांगला निसर्ग तुम्हाला मिळाला आहे. पण आजवर तुम्ही चुकीची माणसे निवडलीत, हे तुमचे दुर्भाग्य आहे. निवडून दिलेली माणसे मोठे झाली, पण या भागात काही आलेच नाही. विदर्भ मराठवाड्याप्रमाणे कोकणातही उद्योगधंदे नसल्याने येथील लोकांना मुंबई, पुणेकडे जावे लागते. ७५० किलोमीटरची किनारपट्टी असूनही पर्यटन विकास होत नाही. येथे येतात ते रिफायनरी व वीज प्रकल्प.याच जमिनीवर मी तुमचा उत्कर्ष करून दाखवू शकतो. जगामध्ये ते पाहिले ते मला इथे करायचंय, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखविली.यावेळी व्यासपीठावर प्रमोद गांधी, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, संतोष नलावडे, विनोद जानवळकर, सुनील हळदणकर, सुनील पात्रे, नितीन साठे, सचिन गायकवाड उपस्थित होते.जमिनी विकू नकाआता शत्रू समुद्रमार्गे नाही, तर जमिनीवरून येत आहे. तुमच्या जमिनी विकत घेऊन तुम्हाला अस्तित्वहीन करण्याचे काम राजकारणी दलाल करीत आहेत. नाणार प्रकल्प रद्द करून बारसू प्रकल्पासाठी पाच हजार एकर जमीन लगेचच उपलब्ध कशी झाली. प्रकल्प येण्याआधीच राजकीय दलाल अशा जमिनी घेऊन ठेवतात. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपले, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.आमदार जाधव यांच्याबद्दल मौनसरकारी धोरणांवर टीका करताना राज ठाकरे यांनी विरोधी पक्षातील आमदार भास्कर जाधव यांच्यावर मात्र कोणतेही विधान केले नाही.
जगभरात पाहिलेला विकास मला कोकणात करायचाय - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 12:22 PM