चिपळूण : मागील दोन विधानसभा निवडणुकी दोन विरोधी पक्षांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत स्वकीयांचा स्वकीयांशीच सामना सुरु आहे. एकेकाळी राष्ट्रवादी व काँग्रेस अशा मित्रपक्षात कार्यरत असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यात मित्र पक्षाची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार असली तरी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यातील सौम्य व वैचारिक स्वरूपाची लढाई प्रथमच चिपळूणकर अनुभवत आहेत.प्रत्येक निवडणुकीत चिपळूण राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात अतिशय संवेदनशील मानले जाते. याआधी माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्यातील राजकीय चढाओढीतून चिपळूण नेहमीच चर्चेत राहिले. त्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण व आमदार शेखर निकम यांच्यातील लढत देखील राजकीयदृष्ट्या तितकीच अटीतटीची ठरली होती. मात्र आताची निवडणूक ही काँग्रेसच्या वैचारिक बैठकीत घडलेल्या आमदार शेखर निकम व प्रशांत यादव यांच्यात थेट लढत होत आहे.आमदार निकम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार यादव हे दोन्ही समाजवादी विचारसरणीच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असे उमेदवार आहेत. महायुतीचे निकम व महाविकास आघाडीचे यादव यांच्यातील ही लढत अजून तरी सौम्य व वैचारिक स्वरूपाची वाटत आहे. हे दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी विकास कामात कोण सरस हे दाखवण्याचे काम करत आहेत. आमदार शेखर निकम यांची ही तिसरी निवडणूक आहे, तर प्रशांत यादव हे प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तरीही निवडणुकीत रंगत अधिक आहे.
- पाच वर्षातील विकास कामे हे शेखर निकम यांचे बलस्थान.
- ‘वाशिष्ठी मिल्क’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला संपर्क हे प्रशांत यादव यांचं बलस्थान.
- शरद पवार यांचा पक्ष सोडणे हे शेखर निकम यांच्यासाठी तर विधानसभेतील नवखेपण प्रशांत यादव यांच्यासाठी परीक्षा पाहणारे आहे.
२०१९च्या निवडणुकीत मिळालेली मते
- शेखर निकम राष्ट्रवादी - १,०१,५७८
- सदानंद चव्हाण शिवसेना - ७१,६५४
- सचिन मोहिते बसपा - २,३९२