रत्नागिरी जिल्ह्यात केवळ राजापूरमध्ये बंडखोरी, चार मतदारसंघांत दुरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:09 PM2024-11-05T16:09:03+5:302024-11-05T16:09:43+5:30
रत्नागिरी, गुहागरला बंडखोरी मागे
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेचे उदय बने आणि गुहागरमध्ये भाजपचे संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्ह्यात आता केवळ राजापूर मतदारसंघात बंडखोरी आहे. तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतलेला नाही.
जिल्ह्यात पाच मतदारसंघात ३८ उमेदवार आहेत. अनेक अपक्ष रिंगणात असले तरी चार मतदारसंघात प्रमुख लढत दुरंगी तर राजापुरात तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर अशा तीन मतदारसंघात बंडखोरी झाली होती. रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेचे उमेदवार बाळ माने रिंगणात असतानाही उद्धवसेनेच्याच उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सोमवारी माघार घेतली.
गुहागरमध्ये भाजपला उमेदवारी न मिळता शिंदेसेनेच्या राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुढळे भाजपच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गुहागरमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी त्यांनी माघार घेतली.
राजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडूकन उद्धवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा नसल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ते सकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात आहेत. यात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असली तरी राजापूरवगळता इतर चार मतदारसंघांमधील प्रमुख लढत दुरंगीच होणार आहे.