रत्नागिरी – गेल्या २ दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातपूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भरतीची व अतिवृष्टीची वेळ एक आल्याने खेड, चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढलेले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.(Flood Situation at Ratnagiri, Chiplun)
मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. चिपळूण शहराला पाण्याने वेढल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. NDRF च्या २ टीम तातडीने तेथे रवाना करण्यात आल्या आहेत. कोस्टल गार्डला बोटीच्या सहाय्याने मदतीसाठी विनंती केली आहे. जेवणाचे पाकीट तयार केले जात आहेत, पूरग्रस्तांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच परशुराम घाटात दरड कोसळल्यानं ३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुरामुळे अद्याप कुठेही जिवीतहानी झाली नाही. पूरग्रस्त भागावर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सरकार कुठेही लोकांच्या मदतीसाठी कमी पडणार नाहीत. आवश्यक असेल ती सर्वोतोपरी मदत करून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. चिपळूण नगरपालिकेने २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अशा ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पुणेहून एनडीआरएफच्या दोन टीम खेडसाठी १ व चिपळूणसाठी १ येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
लांजा तालुक्यातील काजळी व मुचकुंदी नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पावसाची संततधार सुरू राहिली तर मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी व वाकेड पुलावरून पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी काजळी नदीला आलेल्या पुरामुळे अंजणारीतील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी टेकले असून, मुंबई-गोवा महामार्ग ३ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर आंजणारी येथील काजळी नदीच्या शेजारी असणारे श्री दत्तमंदिर पाण्याखाली गेले आहे. यासह नदी शेजारील लोकवस्तीमध्येही पाणी शिरले आहे. तालुक्यातील मुचकुंदी, बेनी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. भांबेड येशील मुचकुंदी नदीच्या पुराचे पाणी शेजारील घरांमध्ये शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने लांजा आगारातील सकाळ सत्रातील एस. टी. फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.