रत्नागिरी : सिंधुरत्न योजनेअंतर्गत महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील १०० महिलांसाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ४ कोटी खर्चाच्या या प्रकल्पातील मच्छिविक्रेत्या महिलांना ५० किलोमीटरच्या क्षेत्रात फिरता यावे, यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत स्कूटर अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील आंबा बागायतदार, मच्छिमार, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री सामंत यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांना चार मालवाहतूक व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला पणन विभागाकडे दाेन व्हॅन देण्यात येणार असून त्या कशा चालतात, याचे निरीक्षण केल्यानंतर उर्वरित दोन दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. यंदा आंब्याचे उत्पन्न कमी आल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत कृषी विभागाशी चर्चा करून त्यांना मदत करण्याबाबत निश्चित विचार होईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील जे शेतकरी भात, नाचणी किंवा मसाला लागवड करू इच्छितात, त्यांना मोफत बियाणे देण्याची योजनाही सिंधुरत्न योजनेतून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बचत गटाच्या महिलांना दूध संकलन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सिंधुरत्न योजनंअंतर्गत २ कोटींचा दूध संकलन प्रकल्प जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. तसेच सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यादृष्टीने मालगुंड येथील प्राणिसंग्रहालयासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून या प्राणिसंग्रहालयासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात हळदीचे उत्पादन चांगल्याप्रकारे घेतले जात आहे. त्यादृष्टीने दापोली येथे संशोधन केंद्राचे उपकेंद्र करावे, अशी माागणी करण्यात आल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.