रत्नागिरीः शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना चिपळूणमधून पराभूत करत राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले आहेत. फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे. महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत होते. 2009 आणि 2014मध्ये विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला होता. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.
राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी 29297 हजारांहून अधिकची विजयी आघाडी घेतली आहे. 2014 साली शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांचा पराभव केला होता. त्यावेळी सदानंद चव्हाण यांना 75695, तर शेखर निकम यांना 69,627 मतं मिळाली होती. परंतु या निवडणुकीत शेखर निकम विजय मिळवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.
चिपळूणमधील शिवसेनेची जागा धोक्यात असल्याचा आणि तेथे चुरशीची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आधीपासूनच होता. भास्कर जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाल्यामुळे शिवसेनेची मते वाढतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला चिपळुणात जोरदार फटका बसला आहे. शेखर निकम यांना १ लाख १ हजार ५७८ तर सदानंद चव्हाण यांना ७१ हजार ६५४ मते मिळाली आहेत.गत निवडणुकीत हेच दोन उमेदवार आमनेसामने होते. त्यात सदानंद चव्हाण सहा हजार मतांनी विजयी झाले होते. पराभूत झाल्यानंतर लगेचच शेखर निकम यांनी मतदार संघात कामाला सुरूवात केली होती. सत्ता नसतानाही अनेक ठिकाणचे पाणीप्रश्न त्यांनी स्वबळावर सोडवले. त्यामुळे यावेळी जिल्ह्यात या मतदार संघात बदल होण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती.गुरूवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच शेखर निकम यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. त्यांना दर फेरीमध्ये मिळणारी आघाडी पाहून आठव्या फेरीनंतर शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण मतमोजणी कक्षातून निघून गेले.