Ratnagiri Rain Updates: दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. दापोली शहरातील केळकर नाका शिवाजीनगर, भारत नगर, नागर गुडी, प्रभू आळी, जालगाव खलाटी या परिसरात पुराचे पाणी चार ते पाच फूट वाढले अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांची धावपळ उडाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री एक वाजेपर्यंत शहरातला पूर कायम होता. एक नंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरले आहे.
दुसरीकडे चिपळूणमध्येही रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे पुराच्या भीतीत नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. पावसानं थोडी उसंत घेतली असली तरी येत्या काही तासांत पाऊस असाच सुरूच राहिला तर समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. दापोली, चिपळूणला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हर्णै समुद्रकिनारी बोट बुडालीसमुद्रकिनारी मंगळवारी सकाळी पुन्हा एक बोट भरकटून बुडाली. तालुक्यातील आंर्ले येथे सोमवारी एका बोटीला जलसमाधी मिळाली. तिला वाचवायला गेलेली बोट गाळात रुतली होती. सुदैवाने ती वाचली. आंजर्लेपाठोपाठ हर्णै येथे बोट बुडाली आहे. पाच सिलेंडरची ही बोट मंगळवारी सकाळी उधाणाच्या भरतीत वाऱ्यावर भरकटली. तिला वाचवण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण बोटीला जलसमाधी मिळली.
हवामान खात्याकडून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाजगेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा आगमन झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पालघर जिल्ह्यालाही अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुंबई, ठाणे शहरांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.