रत्नागिरी : ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असा नारा देत महाविकास आघाडीने शुक्रवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करून पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेसचे अशोक जाधव, उद्धवसेनेचे संजय पुनस्कर, साजीद पावसकर, काँग्रेसचे दीपक राऊत यांच्यासह युयुत्सू आर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. अमेरिकेतही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात; मात्र भारतात अजूनही ईव्हीएमला प्राधान्य का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. भविष्यात सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. महायुतीचा विजय व शपथविधी ईव्हीएमच्या महाघोटाळ्यातून झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
रत्नागिरीत ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:10 IST