रत्नागिरी : समस्त जैन समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान महावीर जयंती कोरोनामुळे शांततेत साजरी करण्यात आली. भाविकांनी मंदिरात न जाता, घरातून अभिवादन केले.
जिल्ह्यात श्वेतांबर व दिगंबर पंथीय जैन समाज वसला आहे. दोन्ही समाजांतर्फे दरवर्षी महावीर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, गतवर्षीपासून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय नियमावलींचे पालन करून भाविकांनी मंदिरात न जाता घरातच भगवान महावीरांचे पूजन करून अभिवादन केले. गतवर्षीच्या तुलनेत कोरोना रूग्णसंख्येत कमालीची वाढ झाली असल्याने सर्वधर्मियांची मंदिरे सध्या बंद आहेत. त्यामुळे जैन मंदिरही भाविकांसाठी बंद असून, मंदिरातील धर्मगुरूंनीच श्री महावीर मूर्तीचे पूजन केले. शांततेत भगवान महावीर जयंती साजरी करून कोरोनापासून समस्त जनतेच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यात आली.